जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून कोल्हापुरातील हौशी आणि व्यावसायिक छायाचित्रकारांच्या कलाविष्काराचे शाहू स्मारक भवनमध्ये भरलंय प्रदर्शन
कोल्हापूर
प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणता छंद असला पाहीजे. त्यातून व्यक्तीमत्व विकास होतो. शिवाय छंदाला सामाजिक जाणीव असेल, तर आनंद द्विगुणीत होतो. आपल्या मदतीचा एक हात, करील दुसर्याच्या जीवनात आनंद निर्माण… ही टॅग लाईन घेऊन, आजपासून कोल्हापूरात हौशी आणि व्यावसायिक छायाचित्रकारांचे फोटो प्रदर्शन सुरू झालं. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्याच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. १९ ऑगस्टपर्यंत चालणार्या या फोटो प्रदर्शनातून मिळणारी रक्कम, सामाजिक उपक्रमासाठी वापरणार असल्यानं, जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन अरुंधती महाडिक यांनी केलं.
१९ ऑगस्ट हा दिवस जागतिक छायाचित्रण दिन म्हणून साजरा केला जातो. सध्याच्या युगात मोबाईलमुळे छायाचित्रण खूपच सोपे झाले आहे. त्यामुळेच अनेक हौशी छायाचित्रकार निर्माण झालेत. जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउन, कोल्हापूर जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन आणि क्रिएटर्स ग्रुप यांच्या वतीने, आज पासून कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन मधील कलादालनात, फोटो प्रदर्शन भरवण्यात आले आहे. हे फोटो प्रदर्शन १९ ऑगस्ट पर्यंत खुले असेल. या प्रदर्शनाचे उद्घाटन, आज रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउनच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले आहे. कोणत्याही छंदाला विधायक सामाजिक कार्याची जोड दिली, तर समाजालाही फायदा होतो. या फोटो प्रदर्शनामधील फोटो, नाममात्र किमतीत उपलब्ध आहेत. त्यातून मिळालेली रक्कम विधायक आणि सामाजिक कार्यासाठी वापरली जाईल, अशी माहिती सौ अरुंधती महाडिक यांनी दिली. हेरिटेज कोल्हापूर आणि निसर्ग, अशा दोन विषयांचे फोटो या प्रदर्शनात मांडले आहेत. एकूण ५२५ फोटोंचा या प्रदर्शनात सहभाग असून, त्यामधील २८५ फोटो मोबाईलद्वारे काढलेले आहेत. पण सर्वच फोटोंचा दर्जा आणि कलात्मकता वाखाणण्यासारखी आहे. तुमच्या मदतीचा एक हात-निर्माण करील दुसर्याच्या जीवनात आनंद, ही टॅग लाईन घेऊन सुरू झालेल्या या प्रदर्शनाला, कोल्हापुरातील नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउनचे माजी प्रांतपाल नासीर बोरसदवाला यांनी केले. दरम्यान अशाप्रकारच्या फोटोग्राफी प्रदर्शनामुळं कोल्हापुरातील उदयोन्मुख आणि प्रस्थापित फोटोग्राफरना एक चांगली संधी मिळाल्याचे, कोल्हापूर जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशनच्या सदस्यांनी सांगितले. तर क्रिएटर्स ग्रुपच्या सदस्यांनी सुध्दा या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. हे फोटो प्रदर्शन पाहण्यासाठी आज पहिल्या दिवसापासूनच नागरिकांची शाहू स्मारक भवनमध्ये गर्दी आहे. यावेळी रघुनाथ जाधव, किशोर पाटोळे, अनिल वेल्हाळ, महेश बागडी, विनोद चव्हाण, विजय टिपूगडे, बी एस शिपुकडे, डॉक्टर मीरा कुलकर्णी, स्मिता कोठावळे, अश्विनी टेंबे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.