राजू शेट्टी यांचा स्वाभिमान फक्त नावालाच
पाठिंब्यासाठी ते लाचार होऊन दुसऱ्यांचे उंबरे झिजवत आहेत
खासदार धैर्यशील माने यांचा टोला
माझ्या उमेदवारीत आता बदल नाही
शिरसाठ यांचा तो फक्त एप्रिल फुल
कोल्हापूर :
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या संघटनेच्या नावात स्वाभिमान असला तरी तो केवळ नावालाच आहे शेट्टी सध्या लाचार होऊन पाठिंबासाठी इतरांचे उंबरे झिजवत आहेत असा आरोप खासदार धैर्यशील माने यांनी केला हातकणंगले मधील आपली उमेदवारी बदलण्यासंदर्भात आमदार संजय शिरसाट यांचे विधान म्हणजे केवळ एप्रिल फुल समजावे असे स्पष्ट करतानाच एकदा दिलेली उमेदवारी बदलत नसते अशी भूमिकाही त्यांनी मांडली
कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना खासदार माने म्हणाले, उमेदवार बदलायचा असता तर जाहीर होण्याच्या आधीच बदलला असता. जाहीर झाल्यानंतर कोणताही बदल आता होणार नाही. उमेदवारी बाबत संभ्रम निर्माण करायची वेळ आता राहिलेली नाही.
राजू शेट्टी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, शेट्टी यांना अद्याप पक्ष आणि दिशा सापडेना, त्यांची ससेहोलपट होत असून वैचारिक घालमेल आहे, नेमकं त्यांना काय करायचं हे सुचत नाही.
एखाद्या वधूला नवरा पाहिजे पण त्याचे आई-वडील नको अशी परिस्थिती शेट्टींची झाली आहे. एका पक्षाचा पाठिंबा पाहिजे पण त्याच्या सोबत असलेल्या दोन्ही पक्षांचा स्पर्श देखील नको. एकटा चलो असा नारा देत असतानाच आता ते पाठिंबा घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या घराचे उंबरटे भिजवत आहेत. मग कसला आला स्वाभिमान?
स्वाभिमान असेल आणि लाचारी पत्करायचे नसेल तर कोणाशी चर्चा करायचा संबंध येत नाही, त्यांनी त्यांचा मार्ग आधीच स्वीकारला आहे , मी कसा निवडून येईल हा त्यांचा प्रयत्न सुरू आहे,.
शेट्टी हे स्वतः पूरतं राजकारण करतात, एका भूमिकेशी कधीही ठाम राहिले नाहीत, त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे मतदार संघातील प्रत्येक मतदाराने पाहिले असल्याचा आरोपी त्यांनी केला.
मयूर उद्योग संघाचे संजय पाटील यांच्या नाराजी विषयी बोलताना ते म्हणाले उमेदवारी मिळताच मी त्यांना फोन केला होता पण ते कोल्हापुरात नव्हते आता सर्व नेते आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी भेटून प्रत्येकाशी चर्चा करत नाराजी दूर करणार आहे.