पराभव दिसत असल्यानेच माझ्यावर दोन वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न
राजेश क्षीरसागर यांचा आमदार सतेज पाटील यांच्यावर आरोप
कोल्हापूर : ” विधानसभा निवडणुकीत पराभव होणार हे स्पष्टपणे दिसू लागल्याने विरोधकांनी मतदानादिवशी दुसरीकडे लक्ष विचलित करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. माझ्यावर दोन वेळा हल्ल्याचा प्रयत्न झाला. माझ्या कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. मात्र त्यांना सांगतो, कार्यकर्त्यांच्या अंगाला हात लावून तर बघा, राजेश क्षीरसागर हा काही षंढ नाही.” असा सज्जड दम कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी दिला.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यावर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये निशाणा साधला. टाकळा आणि कसबा बावडा येथे माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. मात्र आम्हालाही निवडणूक अतिशय शांततेने हाताळायची होती. विकासाच्या मुद्द्यावर आमचा भर होता. यामुळे कुठेही संयम ढळू दिला नाही. कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. कसबा बावडा येथे जो प्रकार घडला. त्यावर दोघांनाही शांतता राहण्याची आवाहन करत त्या विषयावर पडदा टाकला होता. मग अचानक जमाव एकत्र येतो आणि घोषणाबाजी सुरू होते. हा काय प्रकार होता ? असा सवाल करून क्षीरसागर म्हणाले, ” पैसा आणि गुंडागर्दीच्या जोरावर आम्ही राजकारण करत नाही. समाजकारण हा आमचा आधार आहे. आमच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आणि शिकवण आहे. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे आमचे सूत्र आहे.
मतदानादिवशी माझ्यावर दोन वेळा जो हल्ल्याचा प्रयत्न झाला आणि कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा जो प्रकार घडला या साऱ्या घटनेची निवडणूक आयोग राज्याचे गृह विभाग आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे तक्रार केली आहे. आमदार सतेज पाटील हिशोब चुकता करु अशी भाषा करतात हा अतिशय गंभीर प्रकार आहे. मुळात या निवडणुकीत विरोधक पहिल्यापासून चुकीचे वागले. उमेदवारी निवडीत त्यांनी घोळ घातला त्यात आमचा काही दोष नाही. निवडणुकीच्या काळात त्यांनी वाटेल ते आरोप केले बदनामीचा प्रकार केला. मात्र हा सारा प्रकार लोकांना आवडला नाही. ज्यांना जनमानसात स्थान नाही त्यांनी पेन ड्राईव्ह, व्हिडिओचा वापर केला मात्र लोकांनाही तो प्रकार आवडला नाही. विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याऐवजी त्यांनी टिकेचे राजकारण केले. आमदार सतेज पाटील यांच्या बुद्धीची कीव वाटते. त्यांनी रस्ते कामाची वर्क ऑर्डर आणि महापालिकेच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याच्या जीआर संदर्भात प्रश्न उपस्थित करतात. ते आमदार, गृहराज्यमंत्री, पालकमंत्री होते. या कालावधीत त्यांनी शहरासाठी शाश्वत स्वरूपात काय केले ? याउलट गेल्या अडीच वर्षांमध्ये कोल्हापूर शहरासाठी आम्ही किती योजना राबवल्या यासंबंधी जाहीर चर्चा करायला मी आजही तयार आहे.” असे आव्हान क्षीरसागर यांनी पुन्हा दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यात आणि जिल्ह्यात भरीव काम केले आहे. मुख्यमंत्री लाडके बहिण योजना लोकप्रिय ठरली. या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला. लाडक्या बहिणींनी मतदानाच्या स्वरूपात आशीर्वाद दिला आहे. यामुळे पुन्हा राज्यात माहिती सरकार येणार हे निश्चित आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या दहा जागा जिंकून येतील. कोल्हापूर उत्तर मधून आपण निवडून येणार. शिवसेना, भाजप राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेस पक्ष व इतर मित्र पक्षांनी जी मदत केली या साऱ्यांचा मी आभारी मानतो. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात सर्वच भागातून मला मोठा प्रतिसाद मिळाला. याउलट विरोधकांच्या बूथवर कार्यकर्ते नव्हते. ” असेही क्षीरसागर म्हणाले
पत्रकार परिषदेला विद्यमान आमदार जयश्री जाधव, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सत्यजित कदम, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास, शिवसेनेचे शिवाजी जाधव, स्थायी समितीचे माजी सभापती नंदकुमार मोरे, माजी नगरसेवक उत्तम कोराणे, राहुल चव्हाण, शिवसेनेचे सुनील जाधव, तुकाराम साळोखे आदी उपस्थित होते.