*प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गास शेतकऱ्यांसोबत विरोध करुन जमिनी जाऊ देणार नाही*
*राजे समरजितसिंह घाटगे*
कोल्हापूर
प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी कागलसह जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी जात आहेत.त्यामुळे येत्या अठरा तारखेच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरील या विरोधातील मोर्चात शेतकऱ्यांसोबत राहून जमिनी जाऊ देणार नाही .असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
बामणी (ता.कागल) येथे प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठीच्या बाधित शेतकऱ्यांसमवेतच्या बैठकीत ते बोलत होते. कागल तालुक्यात सर्वाधिक मोठ्या प्रमाणात पन्नास एकर जमीन या महामार्ग व त्यासाठीच्या अनुषंगिक सुविधांसाठी अधिग्रहित करण्यात येणाऱ्या जागेची त्यांनी शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी केली. त्यासाठी शेतकऱ्याच्या बुलेरो गाडीतून गेलेल्या घाटगेंनी परत येताना मुख्य रस्त्यापासून दोन किलोमीटर कच्च्या पाणंद रस्त्याने शेतकऱ्याची गाडी स्वतः चालवली.
श्री घाटगे पुढे म्हणाले, या महामार्ग विरोधात कागल तालुक्यातील शेतकऱ्यांनी सर्वप्रथम आवाज उठविला आहे. जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील शेतकरी या महामार्गामुळे बाधित होणार आहेत. त्यामुळे त्या विरोधातील आंदोलन केवळ कागलकरांनी न करता या सर्व विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनाही सामावून घ्यावे. त्यामुळे शासन पातळीवर याची गांभीर्याने दखल घेतली जाईल. लवकरच मुंबईत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना या महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी दिलेले निवेदन देऊ.त्यांना शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे महामार्ग रद्द करण्याबाबतची वस्तुस्थिती पटवून देऊ.
सिटूचे जिल्हा सचिव शिवाजी मगदूम म्हणाले, राज्यात आता भाजप सत्तेत आहे,तर केंद्रातही भाजपचे सरकार सत्तेत येत आहे.त्यामुळे या महामार्गात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी समरजितसिंह घाटगे यांनी हा महामार्ग रद्द करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
यावेळी राजे बँकेचे चेअरमन एम पी पाटील भगवानराव काटे दादासो पाटील रामचंद्र वैराट संतोष पवार पी आर पाटील यांचेसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत युवराज कोईगडे यांनी केले. आभार सुधीर पाटोळे यांनी मानले.
चौकट
*सर्वपक्षिय नेत्यांना राजकारणविरहितपणे एकत्र आणा*
या महामार्ग विरोधात शेतकरी राजकारण बाजूला ठेवून एकत्र आले आहेत.त्याप्रमाणे सहा विधानसभा मतदारसंघातील सर्वच गटातटाच्या राजकीय नेत्यांना कृती समितीने राजकारणविरहितपणे एकत्र आणावे. त्यामुळे हा महामार्ग रद्द करण्यासाठी आणखी तीव्रपणे विरोध करता येईल.असे घाटगे यांनी यावेळी सांगितले.
छायाचित्र बामणी ता कागल येथे प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग विरोधात बैठकीत प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधताना शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे