राहुल गांधी शनिवारी कोल्हापुरात
संविधान संमेलन, शिवाजी महाराज पुतळ्याचे होणार अनावरण
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे शनिवारी सकाळी कोल्हापुरात येणार आहेत. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण व संविधान संमेलन होणार आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांचा शुक्रवारचा पूर्वनियोजित दौरा रद्द करण्यात आला.
पूर्व नियोजनाप्रमाणे राहुल गांधी हे सायंकाळी सहा वाजता कोल्हापुरात येणार होते. सायंकाळी त्यांच्या हस्ते कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार होते. आज त्यांचा मुक्काम होता. शनिवारी सयाजी हॉटेल येथे संविधान संमेलनास ते उपस्थित राहणार होते. पण विमानात बिघाड झाल्यामुळे त्यांचा आजचा दौरा रद्द झाला.शनिवारी सकाळी विमानाने ते कोल्हापुरात येणार आहेत. सकाळी दहा वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर रा.शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाला ते भेट देणार आहेत. दुपारी साडेबारा वाजता संविधान संमेलन होणार असून तेथे ते संवाद साधणार आहेत.
दरम्यान आमदार सतेज पाटील यांनी आयोजित केलेल्या या काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीताला, माजी मंत्री बाळासाहेब थोरात माणिकराव ठाकरे विश्वजीत कदम यांच्यासह अनेक मान्यवर कोल्हापुरात दाखल झाले आहेत.