विकास कामांच्या पूर्ततेसाठी कटिबद्ध राहीन : अमल महाडिक
कोल्हापूर :
दक्षिण मतदार संघातील विकासाचा मुद्दा आता चांगलाच ऐरणीवर आला आहे. गेल्या पाच वर्षांपासून गंभीर समस्यांमध्ये खितपत पडलेला दक्षिण मतदार संघ सर्वांगीण विकासाच्या प्रतीक्षेत आहे. रस्ते, लाईट, तुंबलेल्या गटारी, अस्वच्छता अशी कामे त्या त्या वेळेत होण गरजेचं होत. पण ही विकास कामे केवळ फलकावरच्या स्कॅन कोड वरच दिसतात. प्रत्यक्षात झालेली नाहीत. या सर्व विकास कामांच्या पूर्ततेसाठी मी कटिबद्ध राहीन, असे आश्वासन अमल महाडिक यांनी दिले.
कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ क्रांतीसिंह नाना पाटील नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.
ते म्हणाले, मी आमदार असताना शक्य तितकी कामे करून मतदाराच्या मूलभूत गरजा पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. शहरी आणि ग्रामीण अशा संमिश्र भागात विभागला गेला असल्याने आणि आता उपनगरातही वाढ होत असल्याने भागाच्या गरजाही त्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्या दृष्टीने विकास कामांवर भर देणं गरजेचं आहे.
ते म्हणाले, आपण ज्या मतदार संघात निवडणूक लढवतो त्या मतदार संघातील गरजांची माहिती असणे आवश्यक आहे. त्यानुसार याचा नियोजन बद्ध अभ्यास करून विकासाचे मुद्दे मांडून, त्या रोखाने योग्य पावले उचलण्याचा मी प्रयत्न करेन, असे सांगून विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांनी विकासाच्या निव्वळ घोषणा करून प्रत्यक्षात मात्र विकासाच काही वेगळच चित्र उभ केलं. अशा फसव्या घोषणांवर विश्वास ठेऊ नये. मूलभूत विकासाचा ध्यास घेऊनच मी आजपर्यंत काम केले आहे. मला पुन्हा एकदा आपल्या सेवेची संधी द्या, असे नम्र आवाहन त्यांनी यावेळी केले.
या सभेप्रसंगी क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील सर्व तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, महायुतीचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते, स्थानिक नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.