छत्रपतींच्या घराण्याचे राधानगरीवर अनंत उपकार; म्हणून श्रीमंत छत्रपतींना आमचा बिनशर्त पाठिंबा
: ए. वाय पाटील
नवीन राजवाड्यावर शक्तिपदर्शन करीत ए. वाय. समर्थकांचा मेळावा संपन्न
कोल्हापूर : समतेचा विचार आचरणात आणणाऱ्या ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी राधानगरी वसाहत वसवून तेथे धरण बांधले व कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम केला, त्या छत्रपती घराण्याच्या श्रीमंत शाहू छत्रपतींना प्रचंड मोठे मताधिक्य देण्यात माझे समर्थक कार्यकर्ते कुठेही कमी पडणार नाहीत असा विश्वास व्यक्त करत राधानगरी तालुक्यावर या छत्रपती घराण्याचे मोठे उपकार असल्याने त्याची जाणीव ठेवून त्यातून उतराई होण्यासाठी आम्ही श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना लोकसभेच्या निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी जाहीर केली.
कोल्हापुरातील नवीन राजवाडा परिसरात इंडिया व महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांना पाठिंबा देण्यासाठी ए. वाय. पाटील समर्थकांचा जाहीर मेळावा झाला. याप्रसंगी ते बोलत होते.
श्री पाटील पुढे म्हणाले, “राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या महापुरुषांनी त्याकाळी विस्कळीत झालेला समाज एकत्र बांधण्यासाठी समतेचा विचार पेरला.तोच समतेचा विचार घेऊन अखंड आयुष्य जगणारे कोल्हापूरचे सध्याचे श्रीमंत शाहू छत्रपती यांच्यावर आता देशाचे संविधान वाचवण्याची जबाबदारी काही प्रमुख मंडळींनी दिली आहे. श्रीमंत शाहू छत्रपती हे खासदार होणे म्हणजे कोल्हापूरची सर्वसामान्य जनता खासदार झाल्यासारखी आहे. त्यांना दिल्लीला पाठविण्याची जबाबदारी सर्वसामान्य जनतेसह जिल्ह्यातील प्रमुख नेते मंडळींनी घेतली असून यामध्ये राधानगरी तालुका कुठेही कमी पडणार नाही.”
ते पुढे म्हणाले,”कोल्हापूरच्या विविध विकासकामांमध्ये आणि वेळोवेळीच्या जनआंदोलनांमध्ये श्रीमंत शाहू छत्रपती यांचा सहभाग जिल्ह्याने पाहिला आहे. कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्नांची त्यांना संपूर्ण माहिती आहे. म्हणूनच राजेंच्या रूपाने असे जाणकार आणि आदरणीय व्यक्तिमत्व आपण आपला सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून लोकसभेत पाठवूया”
उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले,” ए. वाय. यांच्या बिनशर्त पाठिंबामुळे माझ्या उमेदवारीला ताकद मिळाली असून त्यांचे राजकीय जीवनातील काम मी पाहिले आहे. त्यांना जेथे होते तेथे न्याय मिळाला नसल्याची त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना असून आता त्यांनी घेतलेली दिशा त्यांच्या भविष्यातील राजकीय जीवनात त्यांचे नक्की चीज करेल.
आमदार पी एन पाटील म्हणाले,” आमचे उमेदवार असलेल्या शाहू महाराजांचे कार्य काय, असे विचारणाऱ्या विरोधकांनी परिते, आरे, चिखली, लाटवडे येथील गोरगरीब शेतकऱ्यांना भेटून श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या कार्याची माहिती घ्यावी. त्यांचे सर्वसामान्य, गोरगरीब जनतेप्रती असलेले विचार या जिल्ह्याला माहिती आहेत. या गावांमध्ये गरजवंतांना स्वतःच्या जमिनी विनामोबदला देण्याचे महत्त्वाचे निर्णय श्रीमंत शाहू छत्रपतींनी घेतले आहेत. स्वतः राजर्षी शाहूंचे विचार कृतीतून जगणाऱ्या श्रीमंत शाहू छत्रपतींना हेच विचार संसदेत मांडण्यासाठी सर्वसामान्य जनता दिल्लीला पाठविणार आहे.”
ए वाय पाटील यांच्या पाठिंब्याबाबत भाष्य करताना ते म्हणाले,”३४ वर्षानंतर ए वाय पाटील यांनी माझ्यासोबत एकत्र येत भोगावती साखर कारखान्याची निवडणूक लढवली आहे. आता या लोकसभेच्या निवडणुकीतही त्यांनी आमच्याबरोबर राहण्याचा घेतलेला निर्णय हा योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय आहे. त्यांच्या जिल्हा बँकेच्या राजकारणाला आमच्या कार्यकर्त्यांनी नेहमीच साथ दिली असून भविष्यात एकाच विचाराने राजकारण व समाजकारण करताना सतेज पाटील व मी तुमच्यासोबत असेन.”
आमदार सतेज पाटील म्हणाले,”ए. वाय. पाटील यांनी श्रीमंत शाहू छत्रपतींना पाठिंबा देण्यासाठी पी एन पाटील यांचा प्रयत्न होता.जिल्ह्याच्या राजकारणात संकटाचा काळ आला असून या लढाईत उतरण्यासाठी आणि हे गढूळ वातावरण निवळण्यासाठीचा शाश्वत विश्वास लोकांना देणे गरजेचे होते. या विचारातूनच श्रीमंत शाहू छत्रपतींनी ही उमेदवारी स्वीकारली असून ए वाय पाटील यांच्या पाठिंब्यामुळे मताधिक्यात मोठी वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.”
विरोधी उमेदवारांचा समाचार घेताना ते म्हणाले,”श्रीमंत शाहू छत्रपतींवर टीका करणार नाही असे आधी जाहीर करणाऱ्या प्रवृत्तीला आपली गाडी आता या प्रवाहात मागे पडणार हे लक्षात आल्यानंतर खोटा अपप्रचार करण्यास सुरुवात केली. आम्ही मात्र २००९ च्या निवडणुकीत स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्याबाबत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जाण राखून असल्या टीका केल्या नाहीत.”
शिवसेनेचे संजय पवार म्हणाले,”जी मंडळी घटना आणि संविधान संपवायला निघाली आहेत त्यांच्यापासून ही घटना, संविधान वाचविण्याचा प्रयत्न म्हणजे ए वाय पाटील यांनी श्रीमंत शाहू छत्रपतींना दिलेला पाठिंबा आहे. .”
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील म्हणाले,”शरद पवार यांनीही ए वाय यांच्या पाठिंब्याची दखल घेतली असून त्यांनी आपलेपणाने ए. वाय. यांच्या राजकीय भूमिकेबाबत चौकशी सुरू ठेवली होती. आता या जाहीर पाठिंबामुळे आपलेपणावर शिक्कामोर्तब झाले आहे.”
यावेळी बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक नेताजी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जिल्हा बाजार समितीचे संचालक शिवाजीराव पाटील व भोगावती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राजाराम कवडे यांची भाषणे झाली. भोगावती साखर कारखान्याचे संचालक मानसिंग पाटील यांनी आभार मानले.
मेळाव्यासाठी माजी आमदार मालोजीराजे, शिवसेना सह संपर्क प्रमुख विजय देवणे, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर के पोवार, पी डी धुंदरे, मधुकर रामाने, कृष्णात पाटील, ए डी पाटील, सुशील पाटील – कौलवकर, बाजार समितीचे अध्यक्ष श्री भुयेकर, नंदूभाऊ पाटील, महादेव कोथळकर, दिनकर बाळा पाटील, रघुनाथ जाधव, संदीप पाटील, सुनील कारंडे, जयसिंग खामकर,दत्ता पाटील, मोहन पाटील,दीपक पाटील, अमर पाटील, अविनाश पाटील, दिलीप कांबळे आदींसह ए वाय पाटील यांचे शेकडो समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते.
………………
राजवाड्यावर यायला परवानगीची गरज नाही…..
आपल्या भाषणात ए वाय पाटील यांनी राजवाड्यावर येण्यासाठीचा विरोधकांचा अपप्रचार खोडून काढला. ते म्हणाले, राजवाड्यावर आपल्या कामासाठी यायला कसल्याही परवानगीची गरज नसून हा माझा अनेक वेळेचा अनुभव आहे. मी ज्या ज्या वेळी येतो त्या त्या वेळी राजवाड्यावर सर्वसामान्य जनता आपले प्रश्न, समस्या घेऊन आलेली मी पाहिली आहे.
……………..
१४ अंकाचे महत्व
आजच्या १४ तारखेला घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सर्वत्र जयंती साजरी होत होती. ए वाय पाटील यांनी पाठिंब्यासाठीच्या मेळाव्याची आजची तारीखही १४ च होती. आणि विशेष म्हणजे ए वाय पाटील यांच्यासह त्यांच्या अनेक समर्थक कार्यकर्त्यांच्या चारचाकी व अगदी दुचाकींचा क्रमांक सुद्धा १४ असाच आहे.
या १४ अंकाबद्दल मेळाव्याच्या स्थळी कार्यकर्त्यांमध्ये आपापसात चर्चा सुरू होती.
……………
चौकट ३
खुर्च्या अपुऱ्या पडल्या एवढी गर्दी !
या मेळाव्यासाठी ए वाय पाटील यांचे समर्थक राधानगरी, भुदरगड, आजरा व करवीर तालुक्यातून मोठ्या संख्येने आले होते.अपेक्षित उपस्थिती लक्षात घेऊन संयोजकांनी मेळावा स्थळी केलेली खुर्च्यांची मांडणी अपुरी पडली. इतका मोठा प्रतिसाद मिळेल हे आपल्यालाही माहीत नसल्याचे व सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे आपल्यावरील प्रेम पाहून आपण भावुक झाल्याचे ए. वाय. पाटील यांनी सांगितले. व्यासपीठांसमोर मोकळ्या जागेत अनेक कार्यकर्त्यांनी बैठक मारली तर असंख्य कार्यकर्ते सभामंडपाच्या बाहेर उपस्थित राहून मेळाव्यातील भाषणे ऐकत होते.
………….