कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेच्या मनातील पालकमंत्री मीच* *वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन*

Spread the news

*कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेच्या मनातील पालकमंत्री मीच*

*वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन*

*पालकमंत्री पदांचे तत्व महायुतीच्या नेत्यांच्या चर्चेतून; श्रद्धा आणि सबुरीसह नेत्यावर निष्ठा*

*कोल्हापूर, दि. २०:*
कोल्हापूर जिल्ह्यातून गेली वीस वर्षे मी मंत्रीपदावर आहे. त्यापैकी केवळ १४ महिनेच मला या जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले. असे असले तरी कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेच्या मनातील पालकमंत्री मीच आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

कोल्हापुरात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना श्री. मुश्रीफ बोलत होते.

ज्येष्ठत्वानुसार तुम्हाला कोल्हापूरचे पालकमंत्री पद मिळायला हवे होते. वाशिमसारख्या छोट्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले. व्यक्तीश: तुम्ही समाधानी आहात काय किंवा नाराज आहात काय? या प्रश्नावर मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, आमच्याकडे श्रद्धा -सबुरी आणि नेत्यावरील निष्ठा आहे. याबाबतच्या माझ्या भावना मी आमचे पक्षनेते व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व खासदार प्रफुलभाई पटेल यांच्याकडे व्यक्त केलेल्या आहेत. ज्यावेळी युतीचे सरकार असते, त्यावेळी अशा घटना घडत असतात. अशावेळी संयमाने घेऊन आपले प्रश्न निकालात काढणे गरजेचे असते. पक्षीय नेतृत्वाकडे नेमक्या काय भावना व्यक्त केल्या? असे विचारताच श्री. मुश्रीफ म्हणाले, ते काय तुम्हाला आज सांगण्यासारखे नाही.

पालकमंत्री पदांच्या विषयांवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा आपल्या गावी आलेले आहेत. महायुतीमध्ये सगळं आलबेल आहे काय? या प्रश्नावर श्री. मुश्रीफ म्हणाले, शिर्डी, छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरून मी आज सकाळीच आलेलो आहे. त्यामुळे काय घडलं आहे हे मला माहीत नाही. उपमुख्यमंत्री शिंदे सातत्याने शेतीचा छंद आणि आवडीच्या निमित्ताने आपल्या गावी येतात. मुख्यमंत्रीही दावोसला गेल्यामुळे कदाचित मंत्रिमंडळाच्या बैठका होणार नाहीत म्हणून ते गावी आले असतील.

सहपालकमंत्री हा नवीनच प्रकार सुरू झाल्याकडे लक्ष वेधले असता, श्री. मुश्रीफ म्हणाले, सह पालकमंत्री ही गोष्ट नवीन आहे हे खरे आहे. यापूर्वी त्याच जिल्ह्यात एखादा दुसरा मंत्री असेल तर तो सह पालकमंत्री असायचा. मी मुंबईला परत गेल्यानंतर हा सह पालकमंत्री विषय काय आहे, हे नक्की समजून घेईन.

साताऱ्यात शिंदे गटाचे दोनच आमदार असताना शंभूराजे देसाई यांना पालकमंत्री पद दिले आहे. याबाबत विचारले असता ते म्हणाले, एकूणच पालकमंत्री पदांच्या वाटपाचे तत्व हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिन्ही नेत्यांनी मिळून ठरवलेले आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद जाहीर होऊन त्या नावाची पुन्हा माघार घ्यावी लागली. हे त्यांचे खच्चीकरण म्हणता येईल काय? तसेच; नाशिकच्या नावालाही स्थगिती मिळाली. याबद्दल विचारले असता श्री. म्हणाले, जे तत्व ठरले आहे त्यानुसारच व्हायला पाहिजे. तत्त्व बिघडल की अशा घटना होतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमधून परत आल्यानंतर हा सगळा प्रश्न मिटेल.

पहाटेच्या शपथविधीला अजितदादांनी जाऊ नये, यासाठी आपण आग्रह धरल्याचे धनंजय मुंडे यांनी भाषणात सांगितले. याबद्दल विचारले असता मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, श्री. मुंडे हे असे वक्तव्य करीत असताना मी व्यासपीठावरच होतो. पहाटेच्या शपथविधीला जाऊ नये म्हणून त्यांनी अजितदादांना अडविले हे मी पहिल्यांदाच ऐकले. यापूर्वी मी त्यांच्या तोंडून तसे कधीही ऐकलेले नाही.

पालकमंत्री पदाच्या गोंधळावरून महायुतीमध्ये आता फक्त खून करणे बाकी राहिले आहे, या संजय राऊत यांच्या वक्तव्यावर श्री. मुश्रीफ म्हणाले, संजय राऊत यांच्या या वक्तव्यात काहीही तथ्य नाही. ज्यावेळी युतीचे सरकार असते, त्यावेळी मत- मतांतरे असतात. असे विषय होत असतात.

बदलापूरप्रश्नी पोलिसांनी अनावश्यक बळाचा वापर ठेवल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, गृहखाते हे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याकडे आहे. त्या विषयाची ते योग्य ती दखल घेतील.

*समन्वयानेच लढू……….!*
कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री म्हणून कोल्हापूर महानगरपालिका, इचलकरंजी महानगरपालिका आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची जबाबदारी तुमच्यावर सोपविलेली आहे. असे विचारताच मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, स्वाभाविकच आहे, अशा निवडणुकांची जबाबदारी पक्षाचा जो मंत्री असतो त्यांनेच उचलायची असते. मी ती उचललीही आहे. राष्ट्रवादीसह भाजप, शिवसेना असे आम्ही तिन्ही पक्ष आणि मित्र पक्ष बसून जिथे- जिथे एकत्र जाण्याची आमची ताकद आहे, तिथे एकत्र लढू. समजा; एखाद्या प्रभागात महायुतीच्यावतीने तीन-चार उमेदवार इच्छुक आहेत आणि त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांचा पराभव होणार असेल तर तिथे योग्य तो तोडगा काढू. मैत्रीपूर्ण लढतीही लढू. परंतु; कोल्हापूर महापालिकेसह इचलकरंजी महानगरपालिका आणि कोल्हापूर जिल्हा परिषद या निवडणुकांमध्ये आम्ही समन्वयांनेच लढू.
============


Spread the news

You may also like

error: Content is protected !!