पोलीस असल्याचे भासवत दाखवला पिस्तुलाचा धाक
म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
पोलीस असल्याचे सांगत घरात घुसून पिस्तुलाचा धाक दाखवण्याचा खळबळजनक प्रकार कोल्हापुरातील शाहूपुरी येथे सोमवारी रात्री घडला. ‘प्रकरण मिटवा नाही तर गोळ्या घालीन’ असे म्हणत त्या अज्ञात तरूणाने दहशत माजवली. याबाबत संदीप विश्वनाथ नष्टे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
कोल्हापुरातील शाहूपुरीत नष्टे हे आपल्या कुटुंबीयासमवेत राहतात. सोमवारी रात्री चाळीस वर्षाचा तरुण त्यांच्या घरात आला. मास्क परिधान केलेल्या या तरुणाने प्रकरण मिटवा, तडजोड करा नाही तर गोळ्या घालीन असे म्हणत नष्टे यांच्या दिशेने पिस्तूल रोखले. कोणते प्रकरण असे विचारताच प्रकरण न सांगता तो वाद घालू लागला. दंगा सुरू झाल्यानंतर गल्लीतील काहीजण तेथे आले. ते पाहून त्याने तेथून पळ काढला.