एक लाख कोटी थकीत बिलाच्या वसुलीसाठी कंत्राटदारांचे राज्यभर काम बंद आंदोलन सुरू
म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
गेल्या आठ महिन्यापासून राज्य सरकारकडे थकीत असलेल्या एक लाख कोटी बिलाच्या वसुलीसाठी राज्यभरातील कंत्राटदारांनी आज पासून विकास काम बंद आंदोलन सुरू केले. राज्यभर विविध सरकारी कार्यालयात या संदर्भात निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता , बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, हाॅट मिक्स असोसिएशनने या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या विविध विभागाच्या वतीने जी विकास कामे झाली, त्याचे एक लाख कोटी रुपये कंत्राटदारांना मिळाले नाहीत. ते मिळावे यासाठी अनेकदा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, ग्रामविकास मंत्री यांना निवेदने देण्यात आली. चर्चा झाली. भेट झाली. पण, गेल्या आठ महिन्यापासून ही बिले मिळाली नाहीत. यामुळे राज्यभरातील साडेतीन लाख छोटे कंत्राटदार अडचणीत आले आहेत.
जोपर्यंत ही बिले मिळत नाहीत तोपर्यंत विकास कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार आज पासून राज्यातील विकास कामे बंद करण्यात आली आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व विविध अधिकाऱ्यांना यासंदर्भात आज संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले.