*पौष्टिक तृणधान्यांचा दैनंदिन आहारामध्ये वापर वाढवा – अमोल येडगे, जिल्हाधिकारी कोल्हापूर*
पणन मंडळ आयोजित तृणधान्य व फळ महोत्सव 2025 चा शुभारंभ
कोल्हापूर, दि. 01 : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, विभागीय कार्यालय कोल्हापूर आयोजित मिलेट व फळ महोत्सव 2025 चे उद्घाटन आज 1 मार्च रोजी दुपारी व्ही.टी. पाटील स्मृती भवन, राजारामपुरी, कोल्हापूर येथे अमोल येडगे, जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी निळकंठ करे, जिल्हा उपनिबंधक, जालिंदर पांगारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर, आशुतोष जाधव, उपसरव्यवस्थापक नाबार्ड, डॉ. अशोक पिसाळ, डॉ. योगेश बन, कृषी विद्यापीठ, दत्ताजीराव वारके संचालक शेतकरी संघ व कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी अमोल येडगे यांनी, मागील दहा वर्षात पौष्टिक तृणधान्याचे क्षेत्र व उत्पादन यामध्ये घट झालेले असून सुद्धा, उत्पादकतेमध्ये वाढ झाल्याचे नमूद केले. मानवी आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक तृणधान्य ही ग्लुटेन फ्री असून त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, या पिकामध्ये फायबर, मिनरल, विटामिन्स, प्रोटीन्स , लोह कॅल्शियम, झिंक, आयोडीन, यासारखे सूक्ष्म पोषक घटक समतोल प्रमाणात असल्याने, विविध आजारांवर गुणकारी असल्याचे वैद्यकीय तज्ञांचे मत आहे असे सांगितले. त्यामुळे पौष्टिक तृणधान्याचा दैनंदिन आहारामध्ये वापर वाढवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे स्ट्रॉबेरी, द्राक्ष, चिक्कू व डाळिंब यासारख्या हंगामी पिकांचा आहारामध्ये समावेश असणे गरजेचे आहे. त्यामुळे पणन मंडळ आयोजित तृणधान्य व फळ महोत्सव 2025 चा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व स्टॉल्सना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनांची माहिती घेतली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी केले. प्रास्ताविकामध्ये कृषी पणन मंडळ मागील वर्षापासून पौष्टिक तृणधान्याचा प्रचार व प्रसार होण्याच्या दृष्टीने दरवर्षी मिलेट महोत्सवाचे राज्यात आयोजन करीत असल्याचे सांगितले. अशा महोत्सवामुळे तृणधान्य व फळ उत्पादकांना आपला उत्पादित शेतमाल ग्राहकांना थेट विक्री करण्याची संधी प्राप्त झाल्याचे सांगितले. कोल्हापूरकरांनी या वर्षी सुद्धा मागील वर्षी प्रमाणे प्रचंड प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले. कृषी पणन मंडळांनी यावर्षी पुणे, नाशिक व कोल्हापूर येथे मिलेट महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास कृषी पणन मंडळाचे प्रतीक गोणुगडे, ओमकार माने, सत्यजित भोसले, अनिल जाधव, किरण जाधव, प्रसाद भुजबळ, पूजा धोत्रे, अमृता जाधव , संदेश पिसे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थित मान्यवरांचे आभार मॅग्नेट प्रकल्पाचे सल्लागार श्री सुयोग टकले यांनी मानले.
००००००