दक्षिणची जनता माझ्यासोबतच राहील
माजी आमदार अमल महाडिक यांचा विश्वास
कोल्हापूर : सत्ता असताना आणि नसतानाही मी दक्षिणच्या विकासात कुठेही कमी पडलो नाही, संपर्कही कायम ठेवला. दक्षिण मधील मतदारांच्या सुखदुखात नेहमीच सोबत राहिलो यामुळे कोल्हापूर दक्षिणमधील जनता माझ्यासोबत आहे. या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा एकदा माझ्या पाठीशी ठाम राहतील असा विश्वास महायुती व भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमल महाडिक यांनी व्यक्त केला
भारतीय जनता पक्षाने कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अमल महाडिक यांना उमेदवारी जाहीर केले आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रथमच प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना अमल महाडिक म्हणाले, सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी दिल्याबद्दल केंद्र व राज्यातील भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षांच्या सर्व नेते मंडळाचे मी आभार मानतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, माझे वडील व माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक या साऱ्यांचे मला नेहमीच पाठबळ लाभलेले आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांची मला जाण आहे. सत्तेत असताना न सत्तेत नसतानाही सातत्याने या मतदारसंघातील विविध विकास कामांना चालना देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. 2014 ते 2019 या कालावधीत आमदार म्हणून काम करताना मतदारसंघात प्रचंड कामे केली. कोल्हापूर दक्षिण मतदार संघात शहर, ग्रामीण, इंडस्ट्रीज क्षेत्राचा समावेश आहे. तीन लाख 69 हजार मतदार संख्या या मतदारसंघात आहे. शेतकरी वर्ग आहे, तरुण मतदार आहेत. औद्योगिक क्षेत्र आहे. मध्यमवर्गीय नागरिक आहेत. प्रत्येक घटकाच्या अडचणी आणि अपेक्षा याची मला पूर्ण माहिती आहे त्या साऱ्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याला माझा प्राधान्यक्रम राहील. विकास कामांच्या मुद्द्यावर आम्ही लोकांना सामोरे जाऊ. आमचा विकासात्मक कामावर भर आहे. त्यामुळे विकास कामांच्या मुद्द्यावरून जनता माझ्यासोबत असेल. ही निवडणूक राज्याची आहे. सातत्याने लोक संपर्कात असल्यामुळे या निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मधील जनता मोठ्या विश्वासाने मला साथ देईल असेही महाडिक यांनी स्पष्ट केले