पालकमंत्री मुश्रीफ यांच्या विरोधात धनंजय महाडिक युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी डागली तोफ
ना एक पैशाचा निधी, ना मिळतो सन्मान
थेट केली तक्रार
कोणताही वेगळा विचार नको, अन्याय झाला तर मी तुमच्या मागे हिमालयासारखा असेन
धनंजय महाडिक यांची ग्वाही
कोल्हापूर
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आमच्यावर अन्याय होत आहे, आम्हाला सन्मान मिळत नाही, आमच्याकडे दुर्लक्ष केले जाते, आम्हाला कोणत्याही कार्यक्रमाला बोलवत नाहीत, आमच्या जीवावर निवडून येतात, श्रेय मात्र दुसऱ्यांना देतात अशी थेट तक्रार धनंजय महाडिक युवाशक्तीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्यासमोर केली.
कागल विधानसभा मतदारसंघातील महाडिक युवाशक्तीचे कार्यकर्ते आज अचानक खासदार महाडिक यांच्या कार्यालयात आले. तेथे त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मुश्रीफ यांच्या विरोधात त्यांनी अन्यायाचा पाढा वाचला. असे होत असेल तर आम्ही का त्यांचा प्रचार करायचा? असा सवालच त्यांनी केला. पालकमंत्री मुश्रीफ हे महायुतीचे संभाव्य उमेदवार असल्याने कोणत्याही परिस्थितीत वेगळा विचार करू नका, अन्याय होत असेल, काही तक्रार असतील तर मी हिमालयासारखा तुमच्या सोबत आहे, माझ्याकडे या अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी त्यांना दिली.
कागल, गडहिंग्लज आणि उत्तुर परिसरातील महाडिक युवा शक्तीचे कार्यकर्ते आज खासदार महाडिक यांच्या कार्यालयात आले. त्यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यावर अनेक आरोप केले.
यावेळी बोलताना विजय फुटाणे म्हणाले, मुश्रीफ गटाकडून आमच्यावर सतत अन्याय होत आहे. कोणत्याही पदाची अपेक्षा व्यक्त न करता आम्ही त्यांना मदत केली. पण आमचा फक्त वापर केला जात आहे. आम्हाला सन्मान दिला जात नाही.
सागर देसाई म्हणाले, महाडिक गट म्हणून आम्हाला नेहमीच दूर ठेवले जाते. आम्हाला मान दिला जात नाही.
शिवाजीराव मगदूम म्हणाले, पालकमंत्र्यांनी आम्हाला आठ कोटी नव्हे आठ पैशाचाही निधी दिला नाही. आमची काम केली नाहीत. समर्जीत घाटगे यांनीही आमच्यावर अन्याय केला. निधी आमचा वापरतात, उद्घाटन ते करतात. आम्हाला साधं बोलवतही नाहीत.
बाळ पोटे -पाटील म्हणाले, युवाशक्तीच्या माध्यमातून आम्ही या मतदारसंघात प्रचंड काम करत आहोत. खासदार महाडिक यांनी आठ कोटींचा निधी आम्हाला दिला. पण, एकाही कार्यक्रमाला पालकमंत्र्यांनी आम्हाला बोलावलं नाही. आम्ही हे का सहन करायचं ? दहा वर्षांपूर्वी मुश्रीफ हे आमच्या मतामुळे निवडून आले. आम्ही किंगमेकर असताना त्यांनी आमदार सतेज पाटील आणि उमेश आपटे यांना किंगमेकर म्हणून जाहीर केले. हे जर असंच चालू राहिलं तर आम्ही त्यांचा प्रचार का करायचा? असा सवालही पाटील यांनी केला.
यावेळी समीर चांद, स्वप्निल पाटील यांच्याशिवाय अनेक कार्यकर्त्यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांच्यावर आपला राग व्यक्त केला. समर्जीत घाटगे यांच्यावर ही काहींनी आरोप केले.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, तुमची अवस्था इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाल्याचे मला दिसते. पण, काळजी करू नका. मी हिमालय आहे. माझ्याकडे या. आपले सर्व प्रश्न मी सोडवेन. महायुती म्हणून एक एकसंघ रहा. पुन्हा महायुतीची सत्ता यावी यासाठीच प्रयत्न करा. तुम्हाला डावललं जात असेल, अन्याय होत असेल, त्रास दिला जात असेल, तर 24 तास माझे दरवाजे उघडे आहेत. कोणताही वेगळा विचार करू नका. माझ्याकडे या असे आवाहन करतानाच कार्यकर्त्यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही, संयमाने कार्यरत रहा असे आवाहन महाडिक यांनी केले.