‘कोल्हापूरात शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय सुरू करणेबाबत विचार करू’
मा. ना. हसन मुश्रीफ
कोल्हापूरः कोल्हापूरमध्ये शासकीय होमिओपॅथिक वैद्यकिय महाविद्यालय सुरू करणेसाठी सकारात्मक विचार करू असे मा. वैद्यकिय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज एक्स स्टुडंटस असोसिएशन (होमेसा) च्या शिष्टमंडळास दिले.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती – शताब्दी महोत्सव राज्यात संपन्न झाला. महाराजांचे आरोग्य क्षेत्रावरही विशेष प्रेम होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी १२६ वर्षापूर्वी देशात सर्वप्रथम सार्वजनिक आरोग्य सेवेत होमिओपॅथिचा समावेश केला त्याची सुरवात कोल्हापूरमध्ये इ. स. १८९८ मध्ये झाली. देशांमधील इतर राज्यात सुमारे ६० शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालये यापूर्वीच सुरू झाली आहेत.
राज्यातील सर्व सहा महसूल विभागामध्ये होमिओपॅथीक वैद्यकिय महाविद्यालये सुरू करून राजर्षी शाहू महाराजांप्रती एक आगळी वेगळी कृतज्ञता व्यक्त करावी. या उपक्रमाची मुहुर्तमेढ आपण कोल्हापूरातून शासकीय होमिओपॅथिक वैद्यकिय महाविद्यालय शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून सुरू करून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांविषयी ऋण व्यक्त करावे असे निवेदन “होमेसा ” च्या शिष्टमंडळाने मा. वैद्यकिय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांना दिले. शासनाच्या होमिओपॅथिक सल्लागार समितीच्या अध्यक्षा डॉ. रजनीताई इंदूलकर यांनीही दूरध्वनीव्दारे ना. हसन मुश्रीफ यांच्याबरोबर महाविद्यालय सुरू करणेबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी माजी मंत्री आ. सतेज पाटील ही उपस्थित होते.
शिष्टमंडळात “होमेसा” प्रेसिडेंट डॉ. राजकुमार पाटील, डॉ. एम. आर. कुलकर्णी, डॉ. हिम्मत पाटील, डॉ. रोझारिओ डिसूझा,डॉ. राजेश कागले, डॉ. सुहास पाटील, डॉ. मिलींद गायकवाड, डॉ. सचिन मगदुम, डॉ. महेश पटेल, व डॉ. दिपकलडगे इत्यादिंचा समावेश होता.