लोकसभा शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेते पदी खासदार धैर्यशील माने
कोल्हापूर प्रतिनिधी
लोकसभा शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी हातकणंगले खासदार धैर्यशील माने यांची निवड करण्यात आली. माने हे लोकसभेवर दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करत आहेत.
मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना कळविले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे सात खासदार निवडून आले आहेत.. सर्व नवनिर्वाचित खासदारांची शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे संसदीय पक्षाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये लोकसभा खासदार धैर्यशील माने यांची लोकसभेतील शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी एकमताने निवड करण्यात आले असल्याचे शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांना कळवले आहे. माने हे हातकणगंले लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. तरुण व अभ्यासू लोकप्रतिनिधी, प्रभावी वक्ता म्हणूनही त्यांची ओळख आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत माने यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांचा पराभव केला होता शिवसेनेतल्या घडामोडीनंतर माने यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना साथ दिली होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार कालावधीत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापुरात तीन दिवस मुक्काम ठोकला होता. मुख्यमंत्री शिंदे यांनी जातीनिशी लक्ष घालून माने यांच्या विजयासाठी जोडण्या केल्या होत्या.