नितीन गडकरींकडून गोकुळचे कौतुक, शौमिका महाडिक करतात दिशाभूल
अरूण डोंगळे यांचा टोला
कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा नावलौकिक हा राज्यातच नव्हे तर देशभर आहे. गोकुळ दूध संकलन, दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत सतत वाढच होत आहे, नफा वाढत आहे, त्यामुळेच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीही गोकुळच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. मग प्रत्येकवर्षी सर्वसाधारण सभेपूर्वी विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक या गोकुळच्या कामकाजावरुन चुकीचे आरोप करत सभासदांची दिशाभूल का करतात असा सवाल संघाचे अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी पत्रकार बैठकीत केला.
ताराबाई पार्क येथील गोकुळच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चेअरमन डोंगळे यांनी गोकुळच्या प्रगतीची माहिती दिली. संचालिका शौमिका महाडिक यांचे आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, केवळ शेतकऱ्यांना फटका बसू नये म्हणून दोन वर्षात पशूखाद्याचे दर वाढवले नाहीत. इतर खर्च वाढला, पण शेतकरी हितासाठी आम्ही खाद्याचे दर वाढवले नाहीत. त्यामुळे नफा थोडा कमी झाला. नफ्यापेक्षा आम्ही सभासदांच्या खिशाला कात्री लागू नये याची काळजी घेतली आहे.
अ वर्ग सभासदासाठी ५० लिटर दूध पुरवठा करण्याची अट रद्द करण्याच्या निर्णयासंबंधी बोलताना डोंगळे म्हणाले, ‘या संबंधी सरकारचे स्पष्ट आदेश आहेत. त्या निर्णयानुसार आम्ही हा निर्णय घेत आहोत. यामध्ये गोकुळचे खासगीकरण करण्याचा डाव कसला ? आमच्यावर आरोप करण्याअगोदर महाडिक यांनी एक लक्षात घ्यावे की दहा वर्षापूर्वी मल्टिस्टेट निर्णयाला विरोध करुन सत्ताधारी आघाडीतून बाहेर पडणारा मी, संचालक होतो. मल्टिस्टेटचा निर्णय हा खासगीकरणाचा प्रकार नव्हता का ? महाडिक यांनी अभ्यास करुन, सगळया गोष्टींची माहिती घेऊन बोलावे.’
गोकुळच्या संकलनात वाढ झाली आहे. दुग्धजन्पदार्थ विक्रीतही वाढ आहे. पशुखाद्य कारखाना हा सहकारी तत्वावर चालतो. ना नफा ना तोटा हे सूत्र आहे. जून २०२२ पासून पशुखाद्याच्या दरात वाढ केले नाही. सभासद हिताचा कारभार सुरू आहे. गोकुळमधील सत्ता परिवर्तनानंतर दुधाला सर्वाधिक दर दिला. दुधाला सर्वाधिक दर देणारा संघ म्हणून गोकुळची ओळख आहे. दरम्यान बाजारपेठेत काही वेळेला विक्री, संकलन, खर्च यामध्ये कमी-अधिक तफावतीचे प्रमाण घडत असते. यावरुन लगेच संघ तोटयात गेला, ठेवी मोडल्या असे आरोप करुन सभासदांमध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये. ’असा टोलाही डोंगळे यांनी लगाविला.
. ’गोकुळमार्फत पशुवैद्यकीय कॉलेज सुरू करण्याविषयी चर्चा होती. मात्र पशुवैद्यकीय कॉलेजसाठी सरकारकडून तीस एकर जागा भाडेतत्वावर मिळाली व अन्य सहकार्य लाभले तरच पुढील निर्णय घेऊ अन्यथा नाही या विचारापर्यत संचालक मंडळ आले आहे. यामुळे पशुवैद्यकीय कॉलेज सुरू करण्यावरुन सुरू असलेले सगळे आरोप हे खोटे आहेत.’ वर्षभरात दुध संकलन वाढले आहे, दुग्धजन्य पदार्थांची विक्री वाढली आहे. यामध्ये ५७ कोटींनी वाढ झाली आहे. तुप, श्रीखंड, बासुंदी, लस्सी या सर्वच पदार्थांची विक्री वाढत आहे.
पत्रकार परिषदेला संचालक विश्वास पाटील, अजित नरके, एस आर पाटील, प्रा. किसन चौगुले, करणसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, राजेंद्र पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोल आदी उपस्थित होते.
……………..
सर्वसाधारण सभा ही सभासदासाठी, संचालकांना बोलण्याचा अधिकार नाही
डोंगळे म्हणाले, ‘ सर्वसाधारण सभा ही दूध उत्पादक व सभासदासाठी असते. त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो. संचालकांनी सर्वसाधारण सभेत प्रश्न विचारायचे नसतात. असे शिवाय संचालक झाल्यापासून शौमिका महाडिक किती वेळा संचालक मंडळाच्या बैठकीला
हजर राहिल्या. किती वेळा कामकाजात सहभाग घेतला. मिटिंगला आल्या तर त्या बोलत नाहीत. प्रॉम्पटर नसल्यामुळे त्या बोलत नसाव्यात असा टोला डोंगळे यांनी मारला. जगदीश पाटील यांची नियुक्तीही नियमानुसार दोन वर्षाच्या कालावधीसाठी झाली आहे. परफॉर्मन्स पाहून नियुक्ती केली आहे. त्यांच्या
मार्केटिंग कौशल्याचा गोकुळसाठी फायदा होत आहे.