निधी तर नाहीच; कसं जगालावं ते बगायला 5 वर्सात यकदाही खासदार आलं न्हाईत…!
कोळींद्रे भागातील ग्रामस्थांनी मांडल्या व्यथा; मात्र संभाजीराजेंच्या ठाम ग्वाहीने पानावल्या शुष्क मनाच्या आशा
आजरा : (प्रतिनिधी)
निधी तर दिला नाहीच; पण आमी कसं जगालाव… कशा परिस्तितीत जगालाव… ते नुसतं बगायला गेल्या 5 वर्सात यकदाही ते खासदार आलं न्हाईत… अशा आगतिक शब्दात दीनवाणे चेहर्यानं पदोपदी व्यथा मांडत आहेत आजरा तालुक्यातील कोळींद्रे जिल्हा परिषद मतदारसंघातील भोळ्याभाबडे ग्रामस्थ…! काळीज हेलावणारे हे कटू सत्य अनुभवत आहेत संभाजीराजे छत्रपती! मात्र गहिरवल्या मनाला घट्ट बांध घालत त्यांनी गर्जना केली आहे… यापुढे तुम्हाला खासदारांचा निधी कधीही कमी पडणार नाही… निधी मागण्याचीही तुम्हावर वेळ येऊ देणार नाही!
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया व महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारदौर्याच्या निमित्ताने संभाजीराजे छत्रपती यांनी कोळींद्रे जिल्हा परिषद मतदार संघात संपर्क यात्रेला सुरूवात केली. त्यावेळी प्रत्येक गावात त्यांना विकास निधीबाबत तक्रारींचा सूर ऐकायला मिळाला. मात्र एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत स्वबळावर जीवनाचा संघर्ष करणार्या या ग्रामस्थांना छत्रपती घराण्याच्या दातृत्त्वाचा महिमा ऐकून माहिती होता. त्यामुळे ठिकठिकाणी संभाजीराजेंच्या स्वागतासाठी त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. त्यांच्या व्यथा ऐकल्यावर संभाजीराजे ठाम ग्वाही देताना म्हणाले, तुमच्या आशावाद वाया जाणार नाही. चिंता करू नका. पाठीशी ठामपणे उभे रहा. कवडीचाही निधी कमी पडू देणार नाही. यावर ग्रामस्थांनी जोरदार जल्लोष केला. तसेच नवऊर्जा मिळालेल्या या ग्रामस्थांनी शाहू छत्रपतींच्या विजयासाठी अहोरात्र कार्यरत राहू, असा शब्द संभाजीराजेंना दिला.
सकाळपासूनच संभाजी छत्रपती यांनी जिल्हा बँकेचे संचालक अप्पी पाटील, डॉ. नंदाताई बाभूळकर, रामराजे कुपेकर, कॉ. संपत देसाई, अजय देशमुख, मुकुंद देसाई, आजरा पंचायतीच्या माजी सभापती सौ. रचना होलम, राजू होलम, नौशाद बुड्ढेखान, आजर्याचे नगरसेवक अभिषेक शिंपी आदींसोबत कोळींद्रे जिल्हा परिषद मतदार संघातील लाकूडवाडी, सुळे, कानोली, संबळवाडी, मलिग्रे, कोळींद्रे, शिरसंगी, वाटंगी, चाफवडे, उचंगी, गजरगाव आदी गावांना भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
लाकूडवाडी येथील सरपंच सौ. जयश्री गिलबिले, शंकरराव कुराडे, भास्कर मोरे, चंद्रकांत गिलबिले, रमेश गिलबिले, गजरगाव येथील राजू पाटील, महादेव पाटील, आनंदा कांबळे, पांडुरंग केसरकर, शिवाजी पाथरवट, अण्णासाहेब पाथरवट, शिवाजी चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, आप्पासाहेब शिंदे, भागोजी पाटील, शंकर पाटील, सरंबळवाडी येथील सरपंच सुनीता कांबळे, राजाराम देवरकर, अनिकेत किल्लेदार, धनश्री किल्लेदार, पांडुरंग सरंबळे, कानोली येथे सरपंच सुषमा पाटील, सुभाष पाटील, मलिग्रे येथील आजरा कारखाना संचालक अशोक तर्डेकर, माजी सरपंच अशोक शिंदे, दूध संस्था चेअरमन शिवाजी कागिनकर, विश्वास बुगडे, विष्णुपंत आसबे, शिवाजी भगुत्रे, वाटंगी येथील विजय देसाई, शिवाजी गिलगिले, आप्पासाहेब कुराडे, बाळू तेजम, अशोक जाधव, मसणू कांबळे तर शिरसंगी येथील धैर्यशील देसाई, जयसिंग थोरवत, दत्तात्रय देसाई, एम. आर. खवरे, अनिल देसाई, अमर कांबळे, युवराज देसाई यांच्यासह ठिकठिकाणचे कार्यकर्ते दौर्यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी विक्रम पटेकर, रविंद्र भाटले, राजू होलम, सौ. रचना होलम, अमित खेडेकर, युवराज पोवार, संजय येसादे, विक्रम देसाई यांच्यासह इंडिया आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यकर्त्यांच्या उत्साहापुढे उन्हाचा तडाखाही नरमला!
उन्हाचा प्रचंड तडाखा जाणवत असूनही कार्यकर्त्यांनी गावागावात संभाजीराजे छत्रपती यांचे मोठ्या संख्येने गर्दी करीत उत्साहात स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी केली जात होती. महिलांकडून त्यांचे औक्षणही केले जात होते. कार्यकर्त्यांच्या सळसळत्या आणि ऊर्जा भारलेल्या उत्साहाने उन्हाचा तडाखाही थिटा पडू लागल्याचे चित्र गावागावात दिसत होते.