एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये राष्ट्रीय संशोधन स्पर्धा संपन्न
सिनॅप्स स्पर्धेच्या माध्यमातून फार्मसी क्षेत्रासंबंधी विद्यार्थ्यांकडून विविध संशोधने सादर
पुणे: एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ फार्मसी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सिनॅप्स’ राष्ट्रीय संशोधन स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ फार्मसी कॅम्पस (ता. २० सप्टेंबर) या ठिकाणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील फार्मसी शाखेच्या पदवी व पदव्युत्तरधारक विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला.
सहभागी स्पर्धकांनी फार्मसी क्षेत्रासंबंधी विविध संशोधने परीक्षकांसमोर सादर केली. संशोधनाच्या विविध संकल्पना, नवनवीन विचार तसेच विविध पद्धती यावेळी पाहायला मिळाल्या. स्पर्धेच्या निमित्ताने, फार्मसी क्षेत्रात चालू असलेल्या अनेक नवीन गोष्टींबद्दल माहिती समोर आली.
अमृतवहिनी कॉलेज ऑफ फार्मसी, संगमनेर यांनी पदवी व पदव्युत्तर गटात जेतेपद पटकाविले. तर, पदव्युत्तर गटात भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, नवी मुंबई आणि एसकेबी कॉलेज ऑफ फार्मसी, नागपूर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले. तसेच, पदवी गटातून सिंहगड इन्स्टिट्यूट नर्हे व ज्ञानविलास कॉलेज ऑफ फार्मसी डुडुळगाव यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवले. एआयएसएसएम सोसायटीचे मानद सचिव मालोजीराजे छत्रपती व प्राचार्य डॉ. आश्विनी माडगुळकर यांनी विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. विजेत्या संघांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
स्पर्धेच्या निमित्ताने डॉ. अजित पाटील (शास्त्रज्ञ), डॉ. गिरीश कोरे (तांत्रिक सेवा व्यवस्थापक, लुब्रिझोल फार्मास्युटिकल्स लि.), डॉ. दिनेश गरूड (सहयोगी प्राध्यापक, रसायनशास्त्र), डॉ. विक्रम घार्गे (संशोधन व विकास संचालक, झुव्हेंटस फार्मास्युटिकल्स लि.), डॉ. आशिष देशमुख (वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, लुपिन लि.), डॉ. विष्णू ठाकरे (तांत्रिक संचालक, सायटेस्ला प्राय. लि.) आदि मान्यवर उपस्थित होते.