नथुराम गोडसे यांच्या विचाराने चाललेले सरकार पाडा : उमेश आपटे
महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपतींच्या प्रचार मिरवणुकीत उतरला सारा उत्तूर परिसर; मेळावाही बनला जनसागर
उत्तूर :
जनतेवर महागाई लादणार्या, लाचारपण आणि लाळघोटेपणाची शिकवण देणार्या, हुकूमशाही पद्धतीने कारभार हाकणार्या आणि गोरगरिबांची फसवणूक करणार्या तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नव्हे तर नथुराम गोडसे याच्या विचाराने चाललेल्या भाजप सरकारला उलटवून टाका, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे यांनी केले.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारार्थ आजरा तालुक्यातील उत्तूर येथे झालेल्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते. हा मेळावा सुरू होण्यापूर्वी शाहू छत्रपती महाराज यांची उत्तूर गावातून सवाद्य प्रचार मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महाराजाचांना पाहण्याच्या प्रत्येक गल्लीगल्लीतील रस्त्यांवर दुतर्फा गर्दी झाली होती. महिलांकडून ठिकठिकाणी महाराजांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. मिरवणूक मार्गावर झुंडीने, गटा-गटाने युवक-युवतींसह ज्येष्ठ नागरिकही या मिरवणुकीत सहभागी होत होते. त्यामुळे अभूतपूर्व गर्दी झाली होती. ही प्रचंड गर्दीच ‘महाराज आम्ही तुमच्याच सोबत आहोत’ अशी साक्ष देऊन गेली.
यानंतर झालेल्या भव्य मेळाव्यात बोलताना उमेश आपटे म्हणाले, ही निवडणूक हुकूमशाही प्रवृत्तीच्या विरोधात आपल्या सर्वांना लढायची आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरणारा, कोणत्याही क्षणी हाकेला धावून येणारा, खुल्या मनाने मदतीचे दान पदरात टाकणारा हा राजा यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्याने अनुभवला आहे. आता आपल्या प्रत्येक समस्या, प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी या राजाला थेट दिल्लीला पाठवण्याची गरज आहे. त्यासाठी आपण सर्वांनी शाहू महाराज यांना निवडून द्यायचे आहे.
कॉ. संपत देसाई म्हणाले, भांडवलशाहीविरूद्ध सर्वसामान्य जनता असे या निवडणुकीला स्वरूप प्राप्त झाले आहे. अदानी आणि अंबानी अशा बड्या धेंडांचाच विकास करण्याची मानसिकता असलेल्या या भाजप सरकारने पायाभूत सुविधाच विक्रीस काढल्या आहेत. जाती आणि धर्मात भांडणं लावून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न सुरू असून तो कोणत्याही परिस्थितीत त्यांचा डाव आपण हाणून पाडलाच पाहिजे.
मुकुंदराव देसाई म्हणाले, भाजपा सरकारला दोन वेळा संधी दिली. पण, त्यांनी दिलेले एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. ना बेरोजगारांना रोजगार मिळाले ना शिवाजी महाराजांचे स्मारक झाले, ना महागाई कमी झाली. सरकारने जनतेची फसवणूकच केली आहे. त्यामुळे आता नाही तर कधीच नाही या इर्षेने मतदान करून भाजप सरकार घालवा असे आवाहन त्यांनी केले.
शाहू महाराज छत्रपती म्हणाले, मातीत सोने पिकवण्याची जिद्द बाळगणारा शेतकरी आजरा तालुक्यात पहावयास मिळतो. पण त्याच्या कष्टाचे चीज होत नाही. भरभरून निसर्गसंपन्नता लाभलेल्या या तालुक्याच्या विकासाचा ध्यास ठेवून यापुढे काम करण्याचा निर्धार आपण केला आहे. त्यामुळे या तालुक्याच्या विकासासाठी, पर्यटन वाढीसाठी, काजूला हमीभाव मिळण्यासाठी आपण निश्चितपणे संसदेत आवाज उठवू.
यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर, प्रा. किसनराव कुराडे, कॉ. संजय तरडेकर, आजर्याचे नगरसेवक अभिषेक शिंपी, किरण कांबळे, संजय सावंत, उत्तूरचे सरपंच किरण आमणगी, माजी सरपंच वैशाली आपटे, महेश करंबळी, संजय उत्तूरकर, राजू खराटे, व्यंकटेश मुळीक यांच्यासह परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.