कोल्हापूर दि. 6 : भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखा 94 एल च्या 6826 च्या सर्व विमाप्रतिनिधीं मार्फत विकास अधिकारी मा.मुरलीधर गावडे यांचा सेवागौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता.
सत्काराला उतर देताना श्री मुरलीधर गावडे म्हणाले, माझे गुरु, माझे जीवलग मित्र, सल्लागार, माझ्या दृष्टीने सर्व काही म्हणजे माझे वडील स्वर्गीय श्री.बाबा गावडे यांच्यामुळेच मी एल.आय.सी. मध्ये विकास अधिकारी म्हणून काम करु शकलो आणि एल.आय.सी.चा अविभाज्य् भाग झालो आहे. उद्यापासून माझ्या आयुष्यातील नवीन अध्यायाला सुरुवात होत आहे आणि त्यासाठी पण तुमच्या शुभेच्छा सदैव माझ्या पाठीशी राहाव्यात. माझा मित्रपरिवार, कुटूंबीय व सर्वांचे सहकार्य मिळाले त्यामुळेच मी 35 वर्षाची सेवा पूर्ण करु शकलो. या एल.आय.सी. मुळे मला अनेक चांगली माणसे मिळाली, जनसंपर्क वाढला आहे. मी जरी सेवानिवृत्त होत असलो तरी मी एलआयसीचा एक भाग म्हणून राहणार आहे. यापुढेही आपणास सर्वांचे सहकार्य असेच मिळत राहावे ही सदिच्छा.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक श्री. नानासाहेब पाटील, माजी मुख्याध्यापक, श्रीमंत माईसाहेब बावडेकर विद्यालय, कोल्हापूर यांनी केले. याप्रसंगी ते म्हणाले, त्यांनी 35 वर्षे सेवा प्रामाणिकपणे पार पाडली आहे. आपणास दिलेले काम प्रामाणिकपणे पार पाडा. तरच असा सेवानिवृती सदिच्छा समारंभ होतो. सेवानिवृती नंतरचे जीवन आरोग्यपूर्ण व्हावे यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे म्हणाले, सर्व विमा प्रतिनिधी विमा क्षेत्रातील व्यवसाय वाढविण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान व कौशल्यांचा अभ्यास करुन अद्ययावत विमा सेवा ग्राहकांना द्याव्यात.
याप्रसंगी सर्व विमा प्रतिनिधींच्या वतीने श्री हितेंद्र साळुंखे, श्री. नानासाहेब पाटील, श्री प्रदीप गिजरे, सौ सुवर्णा पाटील यांच्या हस्ते श्री.मुरलीधर गावडे व प्राचार्या सौ शुभांगी गावडे यांचा शाल, श्रीफळ,पोशाख पुष्पगुच्छ् देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेक्रेटरी मा.प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, कु.गौरव गावडे यांनी तसेच अनेक विमा प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले.
आभार श्री मनोज शिंदे यांनी मानले तर सुत्रसंचालन महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ.सौ.नीता पाटील यांनी केले. याप्रसंगी विमा प्रतिनिधी व गावडे कुटूंबीय उपस्थित होते