Spread the news

भारत जगात अव्वल होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना साथ  द्या
खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन

कसबा सांगाव, दि. १३: भारत देश संपूर्ण जगात अव्वल आणि अग्रेसर होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा. त्यासाठी संजय मंडलिक यांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करा, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.
कसबा सांगाव (ता. कागल) जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य व गोकुळचे संचालक युवराज पाटील होते.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, आपल्या देशावर ६८ वर्षे काँग्रेसने केवळ घोषणा करत राज्य केले. काँग्रेसच्या काळात १२ लाख कोटी रुपयांचे घोटाळे झाले. आता समाजासाठी रस्त्यावर काम करणारे राज्यातील तीन प्रमुख नेते महायुतीच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. पक्की घरे, शौचालय, गॅस, मोफत रेशन, आरोग्य यासह विविध योजना मोदी सरकारच्या काळात सुरू झाल्या. त्यांना तिस-यांदा पंतप्रधान करण्यासाठी संजय मंडलिकांना तालुक्यातून प्रचंड मताधिक्य द्या.

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, लोकसभा निवडणूक आपल्या देशाचे नेतृत्व आणि भवितव्य ठरवणारी आहे. गेल्या अनेक वर्षात काँग्रेसला जे सुचले नाही ते पंतप्रधान मोदींनी केले. शासकीय योजनांचा प्रचार आणि प्रसार सामान्य जनतेपर्यंत पोहचवा. कोणतीही मोठी शक्ती आली तरीही संजय मंडलिक यांना रोखू शकणार नाही. स्व. खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या उपकाराची परतफेड करण्याची ही वेळ आहे. त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मंडलिक यांना निर्णाय मताधिक्य देऊया. स्व. सदाशिवराव मंडलिक यांच्या स्मृती जागृत ठेवूया. कोणाची मने दुखावतील अशी भाषणे करु नका. मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. तालुक्यातील बाहेरील मतदार आणण्यावर भर देऊया. कागल तालुक्याचे लीडच मंडलिकांचे विजयाचे लीड असेल.
संजय मंडलिक म्हणाले, कितीही राजकीय चिखलफेक झाली, तरी आम्ही उत्तर देणार नाही. विकासाचे व्हिजन घेवून आमची वाटचाल सुरू आहे. आम्हाला विकासाचा ब्रँड घेवून जनतेसमोर जायचे आहे. मात्र विरोधकांना दुसऱ्याला बाद करण्याचे तंत्रज्ञान अवगत झाले आहे. शंभर वर्षांचा वारसा सांगत असताना आपण जनतेसाठी काय केले हेही सांगणे महत्वाचे आहे. विकासकामांची आम्हाला आस आहे. देशाच्या प्रगतीसाठी निवडून द्यावे. आपल्या मतदानाच्या उपकाराची परतफेड निश्चित करू. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गोकुळ चे संचालक युवराज पाटील यांनी संजय मंडलिक यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणू अशी ग्वाही दिली. संसदेच्या प्रांगणात राजर्षी शाहू महाराजांच पुतळा उभारणे, कोल्हापूर रेल्वे स्टेशन चे नामकरण यासह अन्य कामातून स्व. मंडलिक यांनी शाहू, फुले, आंबेडकर यांचा वारसा जपला आहे. असे सांगून त्यांच्याप्रमाणे काम करणा-या संजय मंडलिक यांना विजयी करा. असे विजय काळे यांनी आवाहन केले.
भैय्या माने, सुधीर पाटोळे यांनी मनोगत व्यक्त केले. माजी सरपंच रणजित कांबळे, माजी उपसरपंच अजित शेटे, विकास पाटील, प्रकाश गाडेकर, अतुल जोशी, कैलास जाधव, सुधाकर खोत, प्रकाश पाटील, नितीन दिंडे, अमर कांबळे, बाळासो लोखंडे, विशाल शेटे, संजय हेगडे, कृष्णात पाटील आदीसह ग्रामस्थ, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
स्वागत राजेंद्र माने यांनी केले. किरण पास्ते प्रास्ताविक केले. अमर कांबळे यांनी आभार मानले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!