सरकारच चोरण्याची मोदींची नवी परंपंरा
बाळासाहेब ठाकरेंची नाव घेताना मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला
पियांका गांधी यांचा हल्लाबोल
कोल्हापूर
जनतेने संविधानाचा हक्क बजावत निवडून दिलेले सरकारच चोरी, खरेदी करण्याची नवी पंरपंरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे, अशा नेत्यांकडून संविधानाबाबत विचारण्याची हिम्मत होतेच कशी असा थेट सवाल करतानाच आमदार खरेदी करायला शेकडो, हजारो कोटी त्यांच्याकडे येतातच कुठून ? असा हल्लाबोल काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी केला.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ कोल्हापुरातील गांधी मैदानात झालेल्या जंगी जाहीर सभेत गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या निवडणुकीत एवढं मोठं बहुमत द्या की, सरकार चोरण्याची हिम्मत होता कामा नये असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, मोदी व्यासपीठावर येतात, बाळासाहेब ठाकरेचं नाव घेतात आणि त्यांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसतात असा आरोपही त्यांनी केला. यावेळी खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील, आमदार विश्वजित कदम यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले.
प्रियांका गांधी म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणं ऐकली की, दु:ख होतं. सत्य आणि सकारात्मक भाषण ऐकायला मिळत नाही. ते शिवाजी महाराजाचं नाव घेतात, पण, एका ठिकाणी महाराजांचा पुतळा पडला, दुसऱ्या ठिकाणाहून तो हटवला, तिसऱ्या ठिकाणी भूमीपूजन झालं. पण, प्रत्यक्षात पुतळा बसला नाही. त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या भूमीचा अपमान सुरू आहे. दहा वर्षे त्यांची सत्ता आहे, पण शेतकरी, युवक, महिला यांच्यासाठी काहीच केलं जात नाही. निवडणुका तोंडावर आल्यानंतर महिलांना दरमहा पंधराशे रूपये देण्याची मोहीम सुरू केली, मग इतके वर्षे का दिलं नाही असा सवाल करून त्या म्हणाल्या, सत्तेत आल्यानंतर लोकांच्या प्रश्नांची उत्तर देण्याची जबाबदारीच ते घेत नाहीत. निवडणूक आली की, जात, धर्माच्या नावावर समाज भडकवायचं. ही त्यांची परंपरा आहे. आता तर निवडणूक असताना त्याची जबाबदारी न घेता मोदीजी परदेशात गेले. कारण त्यांना निवडणूक महत्त्वाची वाटतच नाही. विकास त्यांना महत्त्वाचे वाटत नाही.
राज्यातील उद्योग बाहेर पाठवले जात आहेत, मित्रांनाच सर्व ठेके दिले जात आहेत असा आरोप करून गांधी म्हणाल्या, पंडित नेहरू, राहूल गांधी यांना आरक्षणाबाबत प्रश्न विचारला जात आहे. नेहरूंनीच आरक्षणाची अमंलबजावणी सुरू केली. राहूलने भारत जोडो, न्याय यात्रेच्या माध्यमातून संविधान बचावचा नारा दिला. उलट, तुम्ही संविधानाने निवडून दिलेले सरकार चोरता, खरेदी करता. भ्रष्टाचार करता असा आरोप एवढ्या बहुमताचं सरकार निवडा की, चोरी करण्याची हिम्मत होणार नाही. त्यासाठी डोळे उघडा, अर्जुनासारखं आता एकच ध्येय ठेवून मतदान करा, ज्यामुळे महाविकास आघाडीचं मजबूत सरकार या राज्यात येईल.
यावेळी सतेज पाटील म्ह्णाले, ही लढाई महाराष्ट्राचा स्वाभिमान, अस्मिता वाचविण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. महागाई, बेरोजगारीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. तुम्ही सारे निष्ठावान आहात. यापुढं महायुतीचे सरकार घालवण्यासाठी सज्ज व्हा.
खासदार शाहू महाराज म्हणाले, महाराष्ट्राची संस्कृती भाजपच्या नेत्यांनी धुळीस मिळवली आहे. आघाडीच्या नेत्यांना टार्गेट करण्याचे गलिच्छ राजकारण सुरू आहे. सरकारी यंत्रणांचा विरोधकांना संपविण्याचा डाव खेळला जात आहे.
यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, उपनेते संजय पवार, विजय देवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, शहराध्यक्ष आर.के.पोवार, संजय डी पाटील, माजी आमदार मालोजीराजे, मधुरिमाराजे, आमदार जयंत आसगावकर, ऋतुराज पाटील, राजेश लाटकर, के.पी. पाटील, राजूबाबा आवळे, राजेश पाटील, गणपतराव पाटील, चेतन नरके, रविकिरण इंगवले, सचीन चव्हाण, चंद्रकांत यादव, अतुल दिघे, दिलीप पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.