आमदार यड्रावकरांचा नवा राजकीय पक्ष
संजय यड्रावकर अध्यक्ष
राजर्षी शाहू विकास आघाडीला
केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यता*
कोल्हापूर
माजी राज्यमंत्री, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी नवीन राष्ट्रीय पक्ष स्थापन केला आहे.
राजर्षी शाहू विकास आघाडी या नावाने असलेल्या या राष्ट्रीय पक्षाला पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. यड्रावकरांचे बंधू आणि माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर हे या पक्षाचे अध्यक्ष आहेत.
आमदार यड्रावकर हे सध्या शिवसेना शिंदे गटात आहेत. शिरोळ विधानसभा मतदार संघातून त्यांना महायुतीची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पण, अपक्ष लढायचे की महायुतीतील पक्षाच्या वतीने याचा निर्णय झाला नाही. याच पार्श्वभूमीवर त्यांचे बंधू संजय पाटील यांनी नवीन पक्षाचीच स्थापना केली आहे. यामुळे आमदार पाटील हे या नव्या पक्षाच्या चिन्हावर लढण्याची शक्यता आहे.
पक्षाला अधिकृत मान्यता मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी संजय पाटील यड्रावकर यांचे पुष्पहार घालून पेढे वाटून अभिनंदन केले. राजर्षी शाहू विकास आघाडीला यापुढे स्थानिक विकास संस्थां बरोबरच विधानसभा निवडणुकीसाठी देखील उमेदवारांना नामनिर्देशित करता येणार आहे, संविधानाचा आदर राखून सर्व समाजातील घटकांना सोबत घेऊन जनहिताचे काम करणे, सामान्य माणसाला न्याय मिळवून देणे आणि विकासाला चालना देणे राजर्षी शाहू विकास आघाडी समोर ही प्रमुख उद्दिष्टे असणार आहेत असे यावेळी संजय पाटील यड्रावकर यांनी सांगितले.
पक्ष नोंदणी कामी मुंबई उच्च न्यायातील ज्येष्ठ कायदेतज्ञ एडव्होकेट सतीश बोरुलकर, एडव्होकेट मनोज पाटील, व स्थानिक कायदेतज्ञ एडव्होकेट विजय गजगेश्वर यांचे सहकार्य लाभले.