जनसुराज्य ची सर्व ताकद मंडलिक माने यांच्या पाठीशी आमदार विनय कोरे यांनी दिली ग्वाही
प्रतिनिधी, कोल्हापूर
कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक आणि खासदार धैर्यशील माने यांच्या पाठीशी जनसुराज्य शक्ती पक्ष ठामपणे उभे राहील आणि प्रचारात उतरेल अशी ग्वाही पक्षाचे प्रमुख आमदार विनय कोरे यांनी दिली.
वारणानगर जनसंपर्क कार्यालय येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार खासदार संजय मंडलिक व हातकणंगले लोकसभेचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांनी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांची भेट घेऊन लोकसभेची उमेदवारी मिळाल्याबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश पाटील(आण्णा),
पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती अनिल कंदुरकर(आप्पा),रमेश पुरेकर,नितीन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेत कोरे यांनी करवीर पन्हाळा हातकणंगले यासह गडहिंग्लज चंदगड या जनसुराज्य शक्ती पक्षाची ताकत असलेल्या भागात दोन्ही खासदारांना मोठे मताधिक्य मिळवून देण्याची ग्वाही दिली. दोन्ही खासदार निवडून यावेत यासाठी जनस्वराज्यशक्ती पक्षाचे सर्व कार्यकर्ते प्रचारात उतरतील असेही त्यांनी स्पष्ट केले.