*आमदार जयंत आसगावकर यांचा विनाअनुदानित कृती समितीच्या उपोषणास पाठिंबा*
*कोल्हापूर :*
वाढीव अनुदानाचा टप्पा आणि जाचक संच मान्यतेचा आदेश रद्द करावा, यासह विविध मागण्यांसाठी विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने गेल्या 29 दिवसांपासून शिक्षण उपसंचालक कार्यालय परिसरात आंदोलन सुरू केले आहे. गेल्या 4 दिवसांपासून समितीच्या वतीने आमरण उपोषण पुकारलेले आहे. आज, गुरुवारी आमदार जयंत आसगावकर यांनी या उपोषणास भेट देऊन आपला पाठिंबा दिला.
यावेळी बोलताना आमदार जयंत आसगावकर म्हणाले, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात जून 2024 पासून वाढीव टप्पा दिल्या जाईल, अशी घोषणा केली होती; परंतु या घोषणेचा आदेश अद्यापही काढलेला नाही. तो आदेश शासनाने तात्काळ काढावा, अशी आमची मागणी आहे. आंदोलन केल्याशिवाय शासनाला जाग येणार नाही. आंदोलनामुळेच शासनावर दबाव पडणार आहे. पण जगदाळे सरांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेत हे आमरण उपोषण मागे घ्यावे. डॉ. श्रीराम पानझडे यांच्यासोबत फोनवर चर्चा झाल्यानंतर त्यांनी त्रुटी पुर्ततेच्या फाईली पुण्याहून मुंबईला पाठवणार असल्याचे सांगितले. परंतु वित्त विभागाकडून वारंवार त्यात त्रुटी काढल्या जातात. तेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी डायरेक्ट वाढीव टप्प्याचा आदेश काढून माझा शिक्षक बांधवांना न्याय द्यावा. जोपर्यंत तुमच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत शिक्षक आमदार म्हणून मी तुमच्या पाठीशी आहे. यावेळी बाबासाहेब पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.