- बारावा नव्हे, मी एक नंबरचा खेळाडू… उमेदवारी मलाच
खासदार मंडलिकांचा दावा
कोल्हापूर / प्रतिनिधी
शिवसेनेची राज्यात आघाडी होत असताना मी बाराव्या क्रमांकावर खासदार म्हणून सही केली नसती तर आघाडीच झाली नसती. मी त्या गटात गेल्यामुळे आघाडी झाली, पण तेव्हापासून मी बारावा नव्हे तर एक नंबरचा खेळाडू असल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी मला वागणूक दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी देणारच असा शब्द त्यांनी दिला आहे. यामुळे मलाच उमेदवारी मिळणार असा स्पष्ट दावा खासदार संजय मंडलिक यांनी केला.
मीच नव्हे तर सर्व 13 खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळणार असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून मंडलिक यांच्या ऐवजी समरजीत घाटगे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा गेले दोन दिवस जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मंडलिक यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर, राजेंद्र यड्रावकर, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी सर्व तेरा खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी आग्रह सुरू असल्याचे यावेळी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार मंडलिक यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार आहे, त्यामुळे प्रचार कसा करायचा याचीच रणनीती आखून कामाला सुरुवात केलेली आहे. कार्यकर्त्यांनाही आपण ते सांगत आहोत असे स्पष्ट केले.
मंडलिक यांनी सांगितले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा दिलेले 13 खासदार महायुतीचे उमेदवार असणार आहेत. तसा शब्दच त्यांनी दिला आहे. आघाडीत येतानाच हा शब्द दिला होता त्यामुळे तो कायम आहे. मी आघाडीत गेलो तेव्हा अकरा खासदार होते, मी गेल्यामुळेच आघाडी झाली. तेरा खासदार नंतर झाले. मी गेलो नसतो तर आघाडी झाली नसती. त्यामुळे मुख्यमंत्री सर्वांना उमेदवारी देण्यासाठी आग्रही आहेत.
कोल्हापूर लोकसभा मतदार संघात महायुतीचा उमेदवार मीच असेन असे सांगून मंडलिक म्हणाले, माध्यमातून येणाऱ्या बातम्याकडे लक्ष देऊ नका असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे उमेदवार जाहीर होईपर्यंत इतर पक्षातील इच्छुक प्रयत्न करतील, पण उमेदवार मीच असेन.