कोल्हापूर :
‘महिलांनी कुटुंबाची योग्य काळजी घेतानाच आपल्या आणि मुलांच्या करिअर बाबतही सतत सतर्क राहायला हवे’ असे आवाहन माजी महापौर
सूरमंजिरी लाटकर यांनी केले.
वीरशैव लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा महिला यांच्यावतीने आयोजित केलेल्या हळदीकुंकू, नववधू सत्कार आणि विधवांचा सन्मान अशा संयुक्त कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जागतिक महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर होत्या.
प्रारंभी महिला मंडळाच्या उपाध्यक्षा वंदना माळी यांनी स्वागत व अध्यक्षा साधना माळी यांनी प्रास्ताविक केले. कार्याध्यक्षा मीनाक्षीताई माळी यांनी महिला दिनाचे महत्त्व विशद केले. कौटुंबिक जबाबदारी पार पडत असताना आपल्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी महिलांनी प्रयत्न करावेत असे आवाहन सौ. क्षीरसागर यांनी केले. समाजाचे अध्यक्ष गुरुबाळ यांनी संघटनेच्या उपक्रमांची माहिती दिली. या समारंभात संमती माळी, सायली बेलकुड या नववधूंचा तसेच वंदना माळी, भारती माळी, गोकुळा माळी, सत्येवा माळी, निर्मला माळी या विधवा महिलांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित असलेल्या महिलांमधून लकी ड्रॉ काढून पाच पैठणी बक्षीस म्हणून देण्यात आल्या. यावेळी आयोजित केलेल्या विविध स्पर्धा आणि खेळांचा महिलांनी आनंद घेतला. संकल्प मेहता, प्रज्योती दावणे यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमास समाजाचे मार्गदर्शक अण्णासाहेब माळी, कार्याध्यक्ष संतोष माळी, विद्या माळी, अंकिता माळी, रूपाली माळी, शीला गोंधळी, श्रुती कुलगुडे, भाग्यश्री माळी, वैशाली माळी तसेच महिला संचालिका, समाज भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.