ग्रामीण विद्यार्थिनींना शिक्षणाद्वारे समर्थ बनविण्याचे शहीद संकुलाचे कार्य आदर्शवत :अनुराधा भोसले शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाचा तिसरा पदवीप्रदान

Spread the news

ग्रामीण विद्यार्थिनींना शिक्षणाद्वारे समर्थ बनविण्याचे शहीद संकुलाचे कार्य आदर्शवत :अनुराधा भोसले

शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाचा तिसरा पदवीप्रदान सोहळा संपन्न
कोल्हापूर: प्रतिनिधी
येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाचा तिसरा पदवी प्रदान सोहळा संपन्न झाला. ग्रामीण विद्यार्थिनींना शिक्षणाद्वारे समर्थ बनविण्याचे शहीद संकुलाचे कार्य आदर्शवत आहे असे प्रतिपादन अवनी संस्थेच्या संस्थापिका अनुराधा भोसले यांनी ह्या प्रसंगी केले.
त्या पुढे म्हणाल्या अवनी संस्था ही अनाथ व बालमजूर मुलांसाठी काम करत आहे. हे काम पुढे नेण्यासाठी आपण सर्व विद्यार्थिनींनी पुढाकार घ्यावा. शहीद महाविद्यालयाने तुम्हाला उत्तम शिक्षण देऊन चांगले नागरिक घडविण्याचे काम सुंदररीतीने केलेले आहे. त्यामुळे एक उत्कृष्ट समाज घडविण्यासाठी तुम्ही योगदान द्यावे, असे आवाहन याप्रसंगी बोलताना अनुराधा भोसले यांनी केले.

ग्रामीण भागातून शिक्षण घेत या महाविद्यालयातील मुलींनी वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपनी मध्ये होत असलेली प्लेसमेंट ही ह्या शहीद शिक्षण संकुलाची चांगली परंपरा म्हणावी लागेल. ही प्लेसमेंट अशीच होत राहो असे मत डॉ.व्ही.व्ही. कार्जीनी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये व्यक्त केले. शहीद महाविद्यालयाच्या पुढच्या कारकीर्दीसाठी वारणा शिक्षण समूह नेहमीच मदत करेल अशी ग्वाही या वेळी त्यांनी दिली. आंतरराष्ट्रीय शिक्षण तज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील, ‘अवनी’च्या संस्थापिका अनुराधा भोसले, शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील, सावली केअर सेंटरच्या संस्थापिका गौरी देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला.

संस्थेचे मुख्य मार्गदर्शक व आंतरराष्ट्रीय शिक्षण तज्ञ डॉ . जगन्नाथ पाटील म्हणाले, ‘आपल्या सर्वांना बलिदान आणि संघर्षाचा इतिहास आहे. आपल्या मुली देशभरातील अनेक नामांकित राज्यातील मुलीना टक्कर देत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळवत आहेत. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. तुम्ही विद्यार्थिनींनी समाजाचे ऋण घेऊन बाहेर पडा व समाजासाठी कार्य करा.’
अडथळ्यांवर मात करत पुढे गेलो तरच आपण घडत जातो. या विद्यार्थिनी निश्चितपणे समाजासाठी चांगलं योगदान देतील असा विश्वास सत्कारमूर्ती गौरी देशपांडे यांनी व्यक्त केला.
या सोहळ्यामध्ये डॉ. कार्जीनी, डॉ. पाटील व मान्यवरांच्या हस्ते “वीरनारी पुरस्कार २०२४” प्रदान करण्यात आले. समाजसेवा , उद्योग, आरोग्य यांसह विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव या निमित्ताने केला जातो. ख्यातनाम सामाजिक कार्यकर्त्या व सावली केअर सेंटरच्या संस्थापिका गौरी देशपांडे यांना मन्यावारांच्या हस्ते ‘वीरनारी सन्मान २०२४’ चे गौरवपत्र व अकरा हजार रुपयांचा धनादेश देवून सन्मानित करण्यात आले . तसेच मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते संगणकशास्त्र ,पत्रकारिता, विज्ञान विभागाच्या विद्यार्थिनींना पदवी प्रदान करण्यात आल्या. इन्फोसिस, टीई कनेक्टिव्हिटी, सर्वग्राम सारख्या विविध राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय कंपन्यात निवड झालेल्या विधार्थिनींचा गौरव करण्यात आला. एस. एन. डी. टी. युथ फेस्टिवल मध्ये पारितोषिक मिळविलेल्या विद्यार्थिनींचा सत्कारही याप्रसंगी करण्यात आला.

पसायदान आणि एसएनडीटी विद्यापीठ गीताने या सोहळ्यास प्रारंभ झाला. गत पाच वर्षातील विविध शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेत प्रारंभी आपल्या प्रास्ताविकात प्राचार्य प्रशांत पालकर यांनी सर्वांचे स्वागत केले. या सोहळ्याला प्रा. डॉ. रत्नाकर पंडित, डॉ. व्ही. व्ही. किलेदार, प्रा. सुनील पाटील, आजी माजी विद्यार्थिंनी, हितचिंतक, पालक आणि शैक्षणिक – माध्यम – सांस्कृतिक विश्वातील मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचालन तेजस्विनी परबकर, सिद्धता गौड यांनी केले तर आभार प्रा.दिग्विजय कुंभार यांनी मानले.

शहीद महाविद्यालयामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ११० गावांमधील ९०० हून अधिक विद्यार्थिंनी शिक्षण घेत आहेत. येथे पारंपारिक शिक्षणाऐवजी कॉम्प्युटर सायन्स, मास मीडिया, डी. एम. एल. टी., कॉम्प्युटर सायन्स, बी.एस्सी मायक्रोबायोलॉजी व फूड अँड न्यूट्रिशन, एम.एस्सी कम्प्युटर सायन्स, एम.एस्सी मायक्रोबायोलोजी, एम.एस्सी रसायनशास्त्र असे आधुनिक, व्यावसायिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम शिकवले जातात. त्यामुळेच परीक्षेपूर्वीच विद्यार्थिनींना मोठमोठ्या कंपन्या मधून नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. महाविद्यालयाच्या विविध विभागातील विद्यार्थिनी टी.सी.एस., कॅप्जेमिनी सारख्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत आहेत. संस्थेचे शहीद पब्लिक स्कूल गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे. विद्यानिकेतन गुणवत्ता शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शहीद पब्लिक स्कूलने अनेक इंजिनियर्स ,डॉक्टर्स व विविध क्षेत्रातील यशवंत घडविले आहेत. त्यामुळे केजीपासून ते पीजीपर्यंत अभ्यासक्रम उपलब्ध असलेले एक अतिशय सुरक्षित व आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे शैक्षणिक संकुल शहीद परिवाराने तिटवे सारख्या खेडेगावात उभे केले आहे.याचे पदवी प्रदान समारंभातील मान्यवरांनी कौतुक केले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!