आरक्षणाची लढाई जिंकायचीच, ताकद लावा
मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन
कोल्हापूर
ज्या राजर्षी शाहू महाराजांनी मराठ्यासह सर्व जातींना आरक्षण दिले, तेच आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी मी तुमच्याच जीवावर ही लढाई लढत आहे, यामुळे आता हार मानायची नाही, लढाई जिंकायचीच आहे, यासाठी आणखी ताकद लावा असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले.
शांतता रॅलीच्या निमित्ताने दुपारी तीन वाजता जरांगे यांचे कोल्हापुरात आगमन झाले. अकरा वाजता येण्याची त्यांची नियोजित वेळ होती. पण, तब्बल चार तास उशिरा आगमन झाल्यानंतरही त्यांचे मिरजकर तिकटी येथे जल्लोषी स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी महाव्दार रोड, पापाची तिकटी मार्गे शिवाजी चौकापर्यंत शांतता रॅली काढण्यात आली. मराठा आरक्षण आमच्या हक्काचे, जय शिवाजी, जय भवानी अशा घोषणा देत ही रॅली निघाली. भगवे ध्वज, भगव्या टोप्या आणि भगवे झेंडे यामुळे वातावरण निर्मिती झाली. शिवाजी चौकात जरांगे यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे, यामुळे ताकद लावा आपण जिंकूच असे आवाहन केले.
जरांगे म्हणाले, मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आमची लढाई सुरू आहे. मराठे नेते मोठे व्हावेत म्हणून तुम्ही प्रयत्न करत आहात. पण, ज्याला मोठं केले, ते नेते समाजाची भूमिका मांडण्यात मागे पडत आहेत. अशावेळी समाजाच्या लेकरासाठी, त्यांच्या भविष्यासाठी आपणच आरपारची लढाई लढायची आहे. आपल्याच लेकरांना मोठं करण्याचं माझं स्वप्न आहे, ते साकार करण्यासाठी मला राजकारण करायचं नाही, पण दुसरा पर्याय नाही. माझी बदनामी करण्याचे काम काहीजण करत आहेत, त्याला मी भीक घालत नाही असा टोलाही त्यांनी मारला.
यावेळी मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, शशीकांत पाटील, चंद्रकांत पाटील, उमेश पोवार, राजू सुर्यवंशी, शाहीर दिलीप सावंत, सागर धनवडे, प्रवीण पाटील, काका जाधव, संदीप पाटील, संभाजी भोकरे,शैलजा पाटील, बाबा पार्टे, जाधव अवधूत पाटील,, लाला गायकवाड, कमलाकर जगदाळे, सुशील भांदिगरे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, शशीकांत पाटील, चंद्रकांत पाटील, उमेश पोवार, राजू सुर्यवंशी, शाहीर दिलीप सावंत, सागर धनवडे, प्रवीण पाटील, काका जाधव, संदीप पाटील, संभाजी भोकरे,शैलजा पाटील, बाबा पार्टे, प्रसाद जाधव, अवधूत पाटील,, लाला गायकवाड, कमलाकर जगदाळे, सुशील भांदिगरे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.