उमेदवारी जाहीर होण्याच्या खात्रीने मंडलिकांच्या गाठीभेटीना वेग

Spread the news

मंडलिकांच्या गाठीभेटीना जोर

प्रचाराचे सुरू झाले नियोजन

मित्रपक्षही झाले सज्ज

मुश्रीफ- महाडिक लागले कामाला

कोल्हापूर/ प्रतिनिधी

महायुतीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार म्हणून प्रा. संजय मंडलिक यांची कोणत्याही क्षणी उमेदवारी घोषित होणार असल्याची खात्री झाल्याने मंडलिक यांनी गाठीभेटीना जोर लावला आहे. त्यांचे मित्र पक्ष असलेले राष्ट्रवादी आणि भाजपही प्रचाराला सज्ज होत असून पालकमंत्री हसन मुश्रीफ व खासदार धनंजय महाडिक नियोजनाच्या कामाला लागले आहेत.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी अद्याप जाहीर झाली नाही. पण, मंडलिक यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी त्यांना फोन करून सांगितले. त्यानंतर उमेदवारी निश्चित झाल्याच्या पार्श्वभूमीवर मंडलिक यांनी नियोजनाला जोर लावला आहे. प्रचारासाठी बैठका सुरू केल्या असून त्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. सोमवारी खासदार धनंजय महाडिक यांची कावळा नाका येथील पंपावर भेट घेतली. तेथे दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. प्रचाराचे नियोजन कसे करायचे यासंदर्भात नियोजन करण्यात आले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचीही मंडलिक यांनी भेट घेतली.

उमेदवारी जाहीर होताच सर्व मित्र पक्षांची तातडीने बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले. यामुळे दोन दिवसात शिवसेनेसह भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील मतदान सात मे रोजी होणार आहे. अजूनही मतदानला 40 दिवस आहेत. महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाल्यामुळे मंडलिकांची उमेदवारी तातडीने जाहीर करावी अशी मागणी जोर धरत आहे. कोणत्या क्षणी त्यांची उमेदवारी जाहीर होण्याची चिन्हे आहेत.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!