मंडलिकांनी दिली भाजप कार्यालयास भेट, दिली मदतीची ग्वाही
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून महायुतीची उमेदवारी जाहीर होताच खासदार संजय मंडलिक यांनी शुक्रवारी भाजप कार्यालयास भेट दिली. मध्यंतरी बदललेल्या राजकीय समीकरणामुळे भाजप कार्यकर्त्यांना न्याय देवू शकलो नसल्याचे मान्य करत यापुढे पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल, कामे केली जातील अशी ग्वाही त्यांनी दिली.
महायुतीचे उमेदवार म्ह्णून मंडलिकांची गुरुवारी रात्री उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर तातडीने शुक्रवारी त्यांनी नागाळा पार्क येथील कार्यालयास भेट दिली. यावेळी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, भाजपचे प्रदेश पदाधिकारी महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, राहूल देसाई, माजी जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, प्रदेश सदस्य राहूल चिकोडे, सत्यजित कदम, शहराध्यक्ष विजय जाधव, संग्राम कुपेकर, अशोक देसाई, नाथाजी पाटील, गिरीष साळोखे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी त्यांचे स्वागत केले.
खासदार महाडिक यांनी मोदींनी पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागावे असे सांगतानाच शिवसेना जेवढे काम करेल, त्यापेक्षा जास्त भाजप करेल असे स्पष्ट केले. यावेळी महेश जाधव यांनी पाच वर्षात खासदारांनी आपल्याकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार केली. पण, राजकीय समीकरणामुळे असे घडल्याचे सांगतानाच यापुढे भाजपच्या कार्यकर्त्यांना योग्य सन्मान मिळेल अशी ग्वाही मंडलिक यांनी दिली.