मंडलिकच महायुतीचे उमेदवार, विजयाचा केला निर्धार
न मिळाल्यास करणार बंडखोरी
कोल्हापूर /प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा विश्वास आहे, त्यांनीच उमेदवारीचा शब्द दिला आहे, दिलेल्या शब्दाप्रमाणे कोल्हापूर लोकसभेची महायुतीची उमेदवारी खासदार संजय मंडलिक यांनाच मिळणार असून त्यांच्या विजयासाठी जीवाचे रान करू असा निर्धार स्वाभिमानी मंडलिक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. आमचा स्वभावच बंडखोरीचा असल्यामुळे उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी करू असा इशाराही काही कार्यकर्त्यांनी या मेळाव्यात दिला.
महायुतीच्या वतीने कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील उमेदवारी बाबत अद्याप निर्णय घेतला नाही, मात्र उमेदवारी बाबत संभ्रमावस्था निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात मेळावा घेतला. मंडलिक यांना उमेदवारी मिळणार नाही, समरजीत घाटगे हे संभाव्य उमेदवार असतील असे काही जण चर्चा करत असल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या मेळाव्यात उमेदवार मंडलिक हेच असतील असे ठासून सांगण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी आणि नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मंडलिक यांना विजयी करू असा विश्वास कार्यकर्त्यांनी या मेळाव्यात व्यक्त केला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सर्जेराव पाटील होते.
मंडलिकांचे कार्यकर्ते विकाऊ नसून विकासाच्या वाटेवर जाणारे आहेत असा विश्वास व्यक्त करून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार यांनी मंडलिक यांना विजयी करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळणार असल्याने मंडलिक यांना बंडखोरी करण्याची वेळच येणार नसल्याचे अतुल जोशी यांनी स्पष्ट केले. मंडलिक गटाचा स्वभावच बंडखोरीचा आहे, यापूर्वीही सदाशिवराव मंडलिक यांनी बंडखोरी करत विजयाचा झेंडा फडकवला आहे. त्यामुळे उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी करण्याचा इशाराही काही कार्यकर्त्यांनी या मेळाव्यात दिला.
या बैठकीत सर्जेराव पाटील, संजय पाटील, दत्ता उगले, रामसिंग रजपूत, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, सुनील बिरंजे यांची भाषणे झाली.
या मेळाव्याला माजी नगरसेवक रमेश पुरेकर, सर्जेराव साळोखे, बाबा नांदेकर, अरुण जाधव, पी. डी. पाटील, नागेश घोरपडे, कृष्णराव कोंडेकर, कल्याणराव निकम, बाबासाहेब शिंदे, पी. डी. पाटील, संजय पाटील,
शेखर मंडलिक आदी उपस्थित होते.