*दहशतमुक्त आणि समृद्ध कोल्हापूरसाठी राजेश लाटकर यांना विजयी करा – आ. सतेज पाटील*
*लाटकर यांच्या प्रचारार्थ शाहूपुरीत सभा*
कोल्हापूर: छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी कोल्हापूर नगरीमध्ये वातावरण बिघडवण्याचे काम काही लोक करत असून त्यांचा बीमोड करण्यासाठी व कोल्हापूर दहशतमुक्त व समृद्ध करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश लाटकर यांना बहुमताने विजयी करा असे आवाहन आ. सतीश पाटील यांनी केले. महाविकास आघाडीचे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारार्थ शाहूपुरी येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. कोल्हापूरची स्वाभिमानी जनता महाडिकांचे पार्सल हद्दपार करेल, असा टोला त्यांनी यावेळी हाणला. ते म्हणाले, लोकसभेनंतर त्यांना लाडकी बहीण आठवली. त्यातही पदरचे पैसे देत असल्यासारखी त्यांची गुर्मीची भाषा आहे. त्यामुळे त्यांना संसदरत्न पुरस्कार कसा मिळाला, याची माहिती घ्यावी लागेल. अशा गुणांमुळेच महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल होण्याबरोबर निवडणूक आयोगानेही नोटीस दिली आहे. येत्या वीस तारखेला एक सामान्य माणूस आमदार होऊ दे. फक्त राजेश लाटकरच नाही तर महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील दहाही उमेदवार बहुमताने विजयी करूया आणि कोल्हापूर जिल्ह्याचा स्वाभिमान मतपेटीतून दाखवून देऊया असे ते पुढे म्हणाले. महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाच्या विकासाचे व्हिजन असणारा जाहीरनामा सादर केला आहे. भविष्याचा वेध घेऊन हा जाहीरनामा तयार केला आहे. यामध्ये महिलांना दरमहा तीन हजार रुपये, पदवीधरांना चार हजार रुपये मानधन, उद्योगांना कर्ज पुरवठा, गरीब, मध्यम आणि उच्च वर्गीय अशा समाजातील सर्वच घटकांचा उत्कर्ष साधणारा व्हिजन समोर ठेवून हा जाहीरनामा तयार केला आहे. स्वार्थी व गद्दार प्रवृत्तीचे सरकार सत्तेतून हद्दपार करण्यासाठी कोल्हापूरच्या जनतेने राजेश लाटकर यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन सतेज पाटील यांनी यावेळी केले.
तळागाळातील जनतेशी संपर्क ठेवणारा कोल्हापूरचा आश्वासक चेहरा आणि शाहू फुले आंबेडकरांचा खरा वारसा जोपासणाऱ्या राजेश लाटकर यांना विजय करून विधानसभेत पाठवा असे आवाहन खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी केले. राजेश लाटकर यांनी महापालिकेत विविध पदे भूषविल्यामुळे त्यांना शहराच्या प्रश्नांची जाण आहे. विकास खुंटलेल्या कोल्हापूर शहराला विकासाच्या प्रगतीपथावर घेऊन जायचे असेल तर लाटकर यांना बहुमताने विजयी करूया. राजेश लाटकर यांचे चिन्ह प्रेशर कुकर असून ते जनतेचे उमेदवार असल्याने त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधकांचे प्रेशर वाढले आहे असे खा.शाहू महाराज म्हणाले. यावेळी बोलताना उमेदवार राजेश लाटकर यांनी माझी उमेदवारी कोल्हापूरच्या विकासासाठी, तरुणाईच्या रोजगारासाठी व महिलांच्या सुरक्षिततेसाठी आहे असे सांगून कोल्हापूरच्या जनतेने सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मला विजयी करावे असे आवाहन केले. सभेस काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेनेचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले, शेकापचे बाबुराव कदम, यांच्यासह माजी नगरसेवक दिलीप शेट्ये, संजय मोहिते, प्रकाश नाईकनवरे, पूजा नाईकनवरे, अमर समर्थ, प्रतिज्ञा उत्तुरे, तसेच शशी बिडकर, हर्षल सुर्वे, विशाल देवकुळे, दिपाली शिंदे, कमलताई पाटील, रहीम बागवान यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिज्ञा उत्तुरे यांनी आभार मानले.