शेतकऱ्यांच्या विकासासाठी मैदानात शाहू महाराज

Spread the news

शाहू महाराजांनी घेतला दलित वस्तीत चहा

सर्वत्र जल्लोषी स्वागत, विजयाचा केला निर्धार

कोल्हापूर : महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांचे कागल तालुक्यातील म्हाकवे येथे जल्लोषी स्वागत. ओपन टफ जीप मधून शाहू छत्रपतींची मिरवणूक. नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग. यामध्ये महिलांची संख्या ही लक्षणीय. वाद्यांचा गजर आणि घोषणा देत गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग आहे. शाहू छत्रपती दलित वस्तीमध्ये जाऊन चहा घेतला.

शाहू छत्रपती यांच्या प्रचारासाठी कागल तालुक्यातील विविध गावात शुक्रवारी प्रचार मेळावे झाले. करनूर नंतर म्हाकवे येथे प्रचारासाठी दाखल होताच ग्रामस्थांनी उत्साही स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाला शाहू छत्रपतींनी अभिवादन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यानंतर दलितवस्तीमधील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी महिलांनी, शाहू छत्रपतींना चहा घेण्याची विनंती केली.त्या विनंतीला मान देऊन छत्रपतींनी त्या महिलेच्या घरी गेले. चहा घेतला. या भागातल्या नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांची प्रश्न जाणून घेतले. त्यांनी दलितवस्तीत नागरिकाशी संवाद साधताना दोन ठिकाणी चहा घेतला.

शाहू छत्रपतींची ओपन टफ जीपमधून मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये गावातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने सहभागी होते. ग्रामदैवत गावडूबाई देवालय येथे प्रचार मेळावा झाला. यावेळी माजी आमदार संजय घाटगे, शिवसेनेचे उपनेते संजय पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवानंद माळी, शाहीर सदाशिव निकम, वंचित बहुजन आघाडीचे रणजीत कांबळे यांची भाषणे झाली. याप्रसंगी गोकुळचे संचालक अमरीश घाटगे, माजी सरपंच ए वाय पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, कॉम्रेड शिवाजीराव मगदूम, काँग्रेसचे सागर कोंडेकर, श्रीपती देवडकर, शामराव देवडकर , विकास पाटील, सिद्धाराम गंगाधरे‌ आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 

 

*शेतकऱ्यांपेक्षा मोठा देशभक्त नाही, त्यांच्यासाठीच मैदानात*

 

कोल्हापूर : “भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून धोरण आखली पाहिजेत. शेतीपेक्षा दुसरी कोणती मोठी उत्पादक संस्था नाही. धान्यापेक्षा कोणतेही मोठे उत्पादन नाही आणि शेतकऱ्यांपेक्षा मोठा कोणी देशभक्त नाही, म्हणून त्यांच्या विकासासाठीच आपण मैदानात उतरलो आहे असे उद्गार महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांनी काढले. दरम्यान, मंडलिकांचा उल्लेख अदृश्य खासदार अशी टीका अंबरिष घाटगे यांनी केली.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती हे शुक्रवारी कागल तालुक्याच्या दौऱ्यावर होते. करनूर, म्हाकवे, आणूर, बानगे या गावात प्रचार मेळावे झाले. माजी आमदार संजय घाटगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील, शिवसेनेचे उपनेते संजय देवणे, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, गोकुळचे संचालक अंबरिश घाटगे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवानंद माळी, काँग्रेसचे शिवाजी कांबळे, सागर कोंडेकर, माजी नगरसेवक माणिक मंडलिक, कॉम्रेड शिवाजीराव मगदूम, शाहीर सदाशिव निकम आदींनी प्रचार दौऱ्यात सहभाग घेतला.

शाहू छत्रपती म्हणाले, “शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, खते, बी- बियाणे माफक दरात शेतकऱ्यांना उपलब्ध झाली पाहिजेत. यासाठी आपला प्रयत्न राहील. शेतीशी निगडित उत्पादनावरील जीएसटी रद्द झाला पाहिजे त्यासाठी जातीनिशी लक्ष घालू.”

माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, “काँग्रेसने देशाची उभारणी केली. साखर कारखानदारी दूध संघ सूतगिरण्या उभारल्या तरुणांच्या हाताला काम दिले. भाजपचे सरकार मात्र रोजगार हिरावून घेत आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याचा डाव आहे. भाजप सरकारच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी महाविकास आघाडीला निवडून द्या. उमेदवार शाहू छत्रपती यांच्या रूपाने कोल्हापूरला सक्षम नेतृत्व लाभले आहे. त्यांना विजयी करूया.”

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवानंद माळी म्हणाले, “काळम्मावाडी पाटबंधारे विभागाने म्हाकवे परिसरातील शेतकऱ्यांना पाणीपट्टीच्या संदर्भाने नोटीसा पाठविले आहेत. या शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका शाहू छत्रपतींनी घ्यावी. पंतप्रधान मोदींच्या नावाखाली महायुती मते मागत आहे. तेंव्हा असा प्रश्न पडतो की, महायुतीचे उमेदवार गेली पाच वर्षे काय करत होते ? ”

गोकुळचे संचालक अंबरिश घाटगे यांनी संजय मंडलिक यांचा उल्लेख अदृश्य खासदार असा केला. पाच वर्षे ते ग्रामीण भागात फिरकले नाहीत मतदार संघात कोणताही प्रकल्प आणला नाही अशी टीकाही घाटगे यांनी केली.

शिवसेना उपनेते संजय पवार यांनी, “भाजप हटाव – देश बचाव”अशी घोषणा देत पुढील वाटचाल करायची आहे. शाहू छत्रपतींच्या माध्यमातून कोल्हापूरला कर्तुत्ववान खासदार लाभणार आहेत. ज्यांनी व्यक्तिगत स्वार्थासाठी मतदारांची फसगत केली अशा खासदार संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने यांना या निवडणुकीत पराभूत करून धडा शिकवा.”


Spread the news

You may also like

error: Content is protected !!