महायुतीचे महाशक्तीप्रदर्शन, राजू शेट्टीही जोरात प्रकाश आवाडेंचे बंड झाले थंड, शाहू महाराज मंगळवारी भरणार अर्ज

Spread the news

महायुतीचे महाशक्तीप्रदर्शन, राजू शेट्टीही जोरात

प्रकाश आवाडेंचे बंड झाले थंड, शाहू महाराज मंगळवारी भरणार अर्ज

कोल्हापूर :

जिल्ह्यातील दोन्ही खासदारांचे अर्ज भरताना महायुतीने सोमवारी महागर्दी करत प्रचंड शक्तीप्रदर्शन केले. दोन दिवसापूर्वी बंडाचे निशाण फडकवणारे आमदार प्रकाश आवाडे यांनी खासदार धैर्यशील माने यांना पाठिंबा दिला. यामुळे त्यांचे बंड थंड झाल्याचे स्पष्ट झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही जागा निश्चित निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. हातकणंगले मतदार संघातून स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनीही मोठी गर्दी करत अर्ज दाखल केला. दरम्यान, कोल्हापूर मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज मंगळवारी अर्ज दाखल करणार आहेत.

महायुतीच्या वतीने कोल्हापूरातून संजय मंडलिक आणि हातकणंगलेतून धैर्यशील माने यांचा अर्ज भरण्यात आला.  ढोल ताशांचा गजर, हलगीचा कडकडाट आणि जय श्रीराम, जय भवानी -जय शिवाजी अशा घोषणा देत शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली. महायुतीमधील सहभागी घटक पक्षांचे कार्यकर्ते नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट, आरपीआय यांच्यासह घटक पक्ष रॅलीत सहभागी होत एकसंधपणा दर्शवला. हाती भगवे -निळे झेंडे, गळ्यात भगवी मफलर आणि पक्षाच्या विजयाच्या घोषणा देत ही रॅली मार्गस्थ झाली. “मान गादीला – मत मोदीला”या आशयाचे फलक लक्ष वेधून घेत होते. मत विकासाला- मत प्रगतीला, अबकी बार ४०० पार अशा घोषणा देत रॅलीचा मार्ग दणाणून सोडला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री रामदास कदम, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे, सदाभाऊ खोत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

हातकणंगलेतून आमदार आवाडे यांनी बंडखोरी करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर सकाळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. बंद खोलीत चर्चा झाल्यानंतर त्यांनी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला. माने यांचा अर्ज भरायला ते उपस्थित राहिले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेट्टी यांनीही प्रचंड गर्दी करत अर्ज दाखल केला. बैलगाडीतून हजारो लोकांच्या रॅलीने त्यांनी हा अर्ज दाखल करताना दसरा चौकात झालेल्या जाहीर सभेत खोक्यांचा बाजार करणारी झुंड माझ्या विरोधात आहे, दुसरीकडे माझ्या सोबत सर्वसामान्य जनता असल्याचे सांगितले.

चौकट

हातकणंगलेतून शिवसेना उमेदवार देणार नाही, असा शब्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला होता. पण, कसबा बावडा आणि इस्लामपुरातून किल्ली फिरली आणि उमेदवारी जाहीर झाली. आता जयंत पाटील आणि सतेज पाटील यांचे कटकारस्थान उलथवून टाकू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!