महायुती सरकारात लाडक्या बहिणी असुरक्षित
असंवेदशील सरकारला हाकलून लावा
शरद पवारांचे चंदगडच्या जाहीर प्रचार सभेत आवाहन
कोल्हापूर
राज्यातील लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीत, ६४ हजार मुली बेपत्ता आहेत, ६४ लाख युवकांना रोजगार नाही, शेतकरी अडचणीत आहे, त्यामुळे ते आत्महत्या करत आहेत. अशी गंभीर स्थिती असतानाही संवेदशिलता नसलेल्या असंवेदनशील राज्य सरकारला सत्तेवरून हाकलून लावा असे आवाहन माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांनी माणगांव, चंदगड येथील विराट सभेत केले.
चंदगड विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार नंदाताई बाबुळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत पवार बोलत होते. जनतेची फसवणूक करणाऱ्या विरोधी उमेदवाराला पराभूत करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी खासदार शाहू महाराज, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, नंदाताई बाबुळकर, अमर चव्हाण, अतुल दिघे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंत्रे, बाळेश नाईक, रामराजे कुपेकर यांची भाषणे झाली. सर्वांनीच विरोधी उमेदवारांवर जोरदार हल्लाबोल केला.
पवार आपल्या भाषणात म्ह्णाले, महाराष्ट्रात काम करताना अनेक जीवाभावाचे मित्र मिळाले. त्यांच्यासोबत महाराष्ट्राच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. या वाटचालीत बाबासाहेब कुपेकर यांच्यासारखा मित्र मिळाला. त्यांच्या निधनानंतर संध्यादेवी कुपेकर यांना आम्ही विनंती केली. त्यांनी होकार देत चांगलं काम केलं. बाबासाहेबांच्या कामाचा वारसा जपण्याची क्षमता नंदाताई बाबुळकर यांच्यात निश्चित आहे. बाबा ज्या गतीने काम करायचे, त्याच गतीने त्या काम करतात. त्यांच्या या कामाला बळ देण्याचे काम आपण करावे. त्यासाठी त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे.
या राज्यात ६४ हजार मुली बेपत्ता आहेत. लाडकी बहीण अशी जाहिरात करताना त्यांच्या सुरक्षेचे काय असा सवाल करताना पवार म्ह्णाले, या बहिणींची सुरक्षा ज्यांच्या हातात आहे, त्यांना जबाबदारी पेलणं शक्य नाही. मग अशा विचाराच्या लोकांना मतदान करणार का असा सवाल करत युवक, शेतकरी यांच्या हिताचा कारभार या राज्यात होताना दिसत नाही. यामुळे महायुती सरकार घालवा असे आवाहन त्यांनी केले.