*महिला व शेतकरी कल्याणाचे* –
*महायुती सरकार तुमच्या सोबत – अमल महाडिक*
कोल्हापूर – शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना महायुती सरकारने राबवल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने वीज बिल माफी व वीजदर कपात याचा उल्लेख करावाच लागेल. याशिवाय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा बोलबाला सर्वत्र आहेच. महिला, शेतकरी यांच्यासह सर्वसमावेशक कल्याणाचे महायुती सरकार सदैव तुमच्या सोबत आहे, असा विश्वास कोल्हापूर विधासनभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अमल महाडिक यांनी दिला.
कळंबा येथे आयोजित प्रचार पदयात्रेत ते बोलत होते. “महायुती सरकार आगामी काळात लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून २१०० रुपये करणार आहे. महिला सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सरकार २५ हजार महिला पोलिसांची भरती करणार आहे. याशिवाय इतरही अनेक योजना सरकारच्या विकास आराखड्यात आहेत. व्हिजन@२०२९ सुद्धा सरकार स्थापनेनंतर १०० दिवसात सादर केले जाणार आहे. तुमच्या सोबतीनेच सरकार स्थापन होऊन ते तुमच्या सोबत राहणार आहे.” असे ते यावेळी म्हणाले.
परिसरातील विकासकामांना प्राधान्य देत मी नेहमीच क्रियाशीलरित्या सर्वांसोबत आहे. पद गेले म्हणून मी आपला संपर्क तुटू दिला नाही. आपल्याकडून ही असेच प्रेम मला मिळाले आहे. यातूनच आपल्यात आपुलकीचे ऋणानुबंध तयार झाले आहेत. हे आपल्याला कायम जपायचे आहे. सर्व नागरिक माझ्यासाठी समान आहेत. तुम्हा सर्वांसाठी मी काम करणार आहे. मला तुम्ही निवडून द्याल हा विश्वास आहे. पण सर्वाधिक मताधिक्क्याने विधानभवनावर पाठवाल याची खात्री आहे.” असे त्यांनी यावेळी सांगितले.
परिसरातील महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडत थेट संवाद साधला. सर्वांच्या समस्या समूळ सोडविण्यासाठी काम करेन, असा शब्द महाडिक यांनी यावेळी दिला.
याप्रसंगी महादेव खानविलकर, दीपक तिवले, छाया भवड, स्वरूप पाटील, भाग्यश्री पाटोळे, संभाजी पोवार (बावडेकर), बाजीराव पोवार, प्रकाश कदम, प्रकाश पाटील (टोपकर), बाळासाहेब खडके, आनंदा पडळकर, दिलीप पाटील, प्रकाश पडळकर, प्रमोद माने, संभाजी जाधव, मारुती मगदूम, दिनकरराव देसाई यांच्यासह परिसरातील तरुण मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महायुतीचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते व तमाम ग्रामस्थ बंधू -भगिनी उपस्थित होते.