महावितरणचे कार्यकारी संचालक सुनिल पावडे यांचे निधन

Spread the news

*महावितरणचे कार्यकारी संचालक सुनिल पावडे यांचे निधन*
*मुंबई, दि. ३ डिसेंबर, २०२४-*
महावितरणचे कार्यकारी संचालक (प्रकल्प) सुनिल रंगनाथ पावडे (वय ५४ वर्षे) यांचे सोमवारी रात्री जळगाव येथे ह्दयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुख:द निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर पारनेर (जि. अहिल्यानगर) तालुक्यातील दरोडी या त्यांच्या मूळ गावी बुधवारी (दि. ४) सकाळी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात सन १९९१ मध्ये कनिष्ठ अभियंता या पदापासून सुनिल पावडे यांनी वीज क्षेत्रातील सेवेला सुरुवात केली. सन २००६ मध्ये सरळसेवा भरतीतून ते कार्यकारी अभियंता झाले. नोव्हेंबर २०१५ पासून अधीक्षक अभियंता म्हणून त्यांनी पुणे ग्रामीण व नाशिक शहर मंडलात काम केले. तद्नंतर २०१८ मध्ये सरळसेवेतून मुख्य अभियंता पदी बारामती परिमंडलात काम केले. मुख्य अभियंता म्हणून काम करत असताना त्यांनी महाराष्ट्राला ‘एक गाव, एक दिवस’ सारखा उपक्रम दिला. दैनंदिन कामातही त्यांनी स्वत:ची छाप कायम सोडली. बारामती परिमंडल कायम अग्रेसर राहील याची काळजी घेतली. मुख्य अभियंता म्हणून त्यांनी बारामती येथे ६ वर्षे काम केले. या दरम्यानच्या काळात त्यांनी काही काळ प्रादेशिक संचालक पदाचा कार्यभारही सांभाळला. जुलै २०२४ मध्ये त्यांची कार्यकारी संचालक (प्रकल्प) पदी निवड झाली होती.
अत्यंत कर्तव्यनिष्ठ व शिस्तप्रिय अभियंता अशी सुनिल पावडे यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे महावितरणच्या वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे. पावडे यांच्या पश्चात त्यांची पत्नी निशिगंधा, मुलगी मृणाल व मुलगा सोहम असा परिवार आहे. त्यांना महावितरणच्या सांघिक कार्यालयात श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
सोबत : फोटो


Spread the news

You may also like

error: Content is protected !!