*महाविकास आघाडीच कोल्हापुरात सर्वाधिक जागा जिंकेल-आमदार सतेज पाटील*
*कोल्हापूर :* आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात शिवसेना, राष्ट्रवादीने काही जागा मागितल्या आहेत. जिथे ज्याची ताकद, तिथे त्याला जागा सोडली जाईल, असे स्पष्ट करत या निवडणुकीत महाविकास आघाडीला सर्वाधिक बळ कोल्हापूर जिल्हाच देईल, असा विश्वास काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केला.
एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार पाटील यांनी राज्यात महाविकास आघाडीचे १५० जागांवर एकमत झाल्याचेही स्पष्ट केले.
आमदार पाटील म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार यावे ही लोकांची इच्छा असून राज्यातील आताची परिस्थिती बदलण्याची भूमिका आम्ही घेतली आहे. महाविकास आघाडीचे १५० जागांवर एकमत झाले असून उर्वरित जागांचा निर्णयही ३० व ३१ सप्टेंबरच्या बैठकीत होईल.
कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या काही जागा अंतिम झाल्या आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीने काही जागा मागितल्या आहेत. काँग्रेसनेही काही जागांवर दावा केला आहे. ज्याची जिथे ताकद असेल त्याला ती जागा सोडली जाईल. विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात महाविकास आघाडी सर्वाधिक भक्कम दिसेल.
*चौकट :*
*मुख्यमंत्रिपदापेक्षा शाश्वत सरकारला प्राधान्य*
मुख्यमंत्रिपदावरून महाविकास आघाडीमध्ये कोणताही वाद नाही. सर्वच पक्षांना मुख्यमंत्रीपद मिळावे असे वाटते, त्यात काही गैर नाही. मात्र, या पदापेक्षा शाश्वत सरकार देणे यालाच आमचे प्राधान्य राहील. महाविकास आघाडी हा मोठा भाऊ म्हणून निवडणुकीत उतरेल, असे आमदार पाटील यांनी सांगितले.
*पश्चिम महाराष्ट्रात ४५ हून अधिक जागा जिंकू*
लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. आगामी विधानसभा निवडणुकीतही ५८ पैकी ४५ हून अधिक जागा जिंकू असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.