*महाशिवरात्रीसाठी प्राचीन सिद्धगिरी मठ सज्ज…*
कोल्हापुर(करवीर) हे नाव अनेक पुराण-ग्रंथामध्ये उल्लेखित असणारे एक प्राचीन व संपन्न नगर म्हणुन विख्यात आहे. या जिल्ह्याला धार्मीक, ऐतिहासिक आणि सामाजिक प्रतिष्ठेची पार्श्वभूमी आहे. “दक्षिण काशी ” असणा-या या कोल्हापुरच्या लौकिकात भर टाकणारा योगी व सिध्दपुरुषांच्या पवित्र वास्तव्याने पुनित झालेला एक प्राचीन मठ ही या पवित्र भूमीत आहे तो म्हणजे ” श्रीक्षेत्र सिध्दगिरी मठ”!!
महाराष्ट्राच्या संतभूमीत भारतीय संस्कृती वारसा जपणारा मठ म्हणून कोल्हापूर येथील श्री क्षेत्र सिध्दगिरी मठ विख्यात आहे. श्री काडसिध्देश्वर सांप्रदायाचे मूळ स्थान म्हणुन प्रसिध्द पावलेला “श्रीक्षेत्र सिध्दगिरी मठ” हा सांप्रत कोल्हापूर शहरापासुन दक्षिणेला निसर्गरम्य परिसरात वसलेला आहे.श्रीक्षेत्र सिध्दगिरी मठ अत्यंत पुरातन, धार्मीक,योगीक व अध्यात्मिक पीठ आहे. याची ओळख “जगद्गुरु काडसिध्देश्वर संस्थान मठ” अशी आहे. या मठाच्या जवळच कणेरी गाव आहे, म्हणूनच मठाला “कणेरी मठ” असेही म्हणतात. संशोधित व प्राप्त ऎतहासिक संदर्भानुसार “श्रीक्षेत्र सिध्दगिरी मठाला” १३५० वर्षांपेक्षा अधिक प्राचीन पंरपरा लाभली आहे. अश्या शेकडो वर्षांची पंरपरा असणा-या प्राचीन मठाचे अधिपती पुज्यश्री काडसिध्देश्वर स्वामींजींच्या आधीपत्याखाली अनेक सामाजिक उपक्रमाची जोड दिल्यामुळे मठाचा लौकिक देशभर पसरलेला आहे.
मठावर असणाऱ्या प्राचीन शिवमंदिराचा लौकिक सर्वदूर असल्यामुळे या मठावरील मंदिरात दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा येथून लाखो भाविक दर्शन घेण्यासाठी येणार असल्यामुळे त्यांच्या साठी पूरक असे नियोजन श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठ महासंस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. दिनांक 26 ते 28 या कालावधीत प्रवचन, भजन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, गुरुकुल विद्यार्थी यांचे सादरीकरण असे कार्यक्रम तीन दिवस चालणार आहेत. यावेळी तिन्ही दिवस सर्वांसाठी मोफत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी सिद्धगिरी हॉस्पिटल येथे भारतात पहिल्यांदा दाखल झालेल्या न्युरो मायक्रोस्कोपचा लोकार्पण सोहळा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते शिवरात्रीला होणार असून सिद्धगिरी हॉस्पिटलच्या वतीने तीन दिवस मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन महासंस्थान मार्फत करण्यात आले आहे.