*महाराष्ट्र सरकारच्या जैन अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी ललित गांधी यांची निवड*
*राज्यमंत्री दर्जा सह पहिल्या अध्यक्षपदाचा मान कोल्हापूरला*
मुंबई ः महाराष्ट्र सरकारने नव्याने स्थापन केलेल्या जैन समाज अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय जैन अल्पसंख्यक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांची निवड करण्यात आली आहे.
जैन समाजाच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी स्वतंत्र महामंडळाची जैन समाजाची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य करून 4 ऑक्टोबरच्या कॅबिनेटमध्ये महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ललित गांधी यांची गेल्या अकरा वर्षात देशभर केलेल्या कामाची दाखल घेऊन सरकारने ही निवड केली असून राज्यमंत्री दर्जाचे अध्यक्ष पद मिळाल्याने जैन समाजात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
या महामंडळाचे मुख्यालय मुंबई येथे राहणार असून प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालय कार्यरत राहणार आहे.
महामंडळाच्या उद्देशामध्ये प्रामुख्याने पुढील गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
राज्यातील जैन समाजाच्या कल्याण व विकासासाठी काम करणे व त्यांचे सामाजिक सक्षमीकरण करणे., जैन समाजाच्या व्यक्तींना अल्प व्याज दराने स्वयंरोजगाराकरिता कर्ज उपलब्ध करुन देणे व त्याची वसूली करणे, जैन समाजाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पतसाधने, साधनसामुग्री आणि तांत्रिक व व्यवस्थापकीय साधने पुरविणे, जैन समाजासाठी आवश्यक साहित्य आणि सामुग्री यांची निर्मिती, जुळवणी व पुरवठा यासाठी आवश्यक वाटतील अशा सेवा देणे, राज्यातील जैन समाजाच्या कल्याणासाठी योजना सुरु करणे आणि त्यांना चालना देणे व योजनासाठी अहवाल तयार करणे, अतिप्राचीन जैन तीर्थांचे संरक्षण व संवर्धन, अतिप्राचीन जैन ग्रंथांचे संरक्षण संवर्धन व पुर्नलेखन, कायम पायी विहार करणार्या जैन साधू संतांच्या विहारसाठी सुरक्षा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या जैन विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व शैक्षणिक कर्ज व्यवस्था, जैन समाजाच्या विधवा, परित्यक्ता महिलांसाठी विशेष योजना इत्यादी.
या निवडीनंतर प्रतिकिया व्यक्त करताना ललित गांधी यांनी मुयमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले वचन पूर्ण केल्याबद्दल विशेष धन्यवाद देऊन उपमुयमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित दादा पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, मंगल प्रभात लोढा नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर खासदार धैर्यशील माने, मित्राचे उपाध्यक्ष अजय आशर यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले व समाजाच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करू असे सांगितले.