महापालिकेचे बजेट म्हणजे ‘स्वप्नांचे इमले आणि कल्पनांचे मनोरे’, महापालिका वसुली करण्यात अपयशी, बजेट अवास्तववादी – आप ची टीका
कोल्हापूर महानगरपालिकेने नुकताच सन 2025-2026 साठी 1334.76 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये 707.64 कोटी इतके महसूली उद्धीष्ट ठेवण्यात आले. परंतु मागचा अनुभव पाहता घरफाळा, पाणीपुरवठा, इस्टेट तसेच परवाना यासारख्या महसूल गोळा करून देणाऱ्या विभागांना 80% देखील वसुली उद्धीष्ट गाठता आलेले नाही. त्यामुळे मागील बजेट मधील 588 कोटी महसूल गोळा होणे अपेक्षित असताना केवळ 481 कोटी इतकीच वसुली झाली. परिणामी स्वनिधीतून करण्यात येणारी कामे तसेच भांडवली खर्च होऊ शकले नाहीत.
रिव्हीजन सर्व्हे अपूर्ण
नवीन मिळकती शोधून घरफाळा महसूल वाढवण्यासाठी गेले दोन वर्षे रिव्हीजन सर्व्हे करण्यात येत आहे. परंतु केवळ 25 हजार इतक्याच मिळकतींचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. यामुळे महसूलात म्हणावी तशी वाढ झाली नाही. किती बड्या थकबाकीदारांवर कारवाई केली याची यादी महापालिकेने प्रसिद्ध केल्यास वसुलीचे वास्तव समोर येईल.
पाणीपुरवठा विभागाने खर्च वाढवले
पाणीपट्टी वसुलीत केवळ 56 कोटी जमा करणारा हा विभाग मात्र खर्चात अव्वल ठरला. शहराची गरज पाहता केवळ 80-85 एमएलडी पाणी उपसा होणे अपेक्षित असताना 250 एमएलडी पाणी उपसा करून विजेवर वारेमाप खर्च करण्यात आला. पाणी गळती काढण्यासाठी कोणतीच ठोस तरतूद यावर्षीच्या बजेटमध्ये सुद्धा दिसून येत नाही.
मागील पानावरून पुढे
बंदिस्त पार्किंग खुले करणे, दिशादर्शक फलक, खाजगी ट्रॅव्हल्ससाठी पार्किंग, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतीसदन, ग्रीन स्पेस विकास, मल्टी लेव्हल कार पार्किंग, महाराणा प्रताप चौकात व्यापारी संकुल, हेरिटेज टाईप पोल ही आश्वासने मागील पानावरून पुढे अशीच ठरली. मागील बजेट मध्ये यासाठी तरतूद केली होती पण प्रत्यक्षात अनेक कामे सुरु देखील झाली नसल्याची परिस्थिती आहे.
रंकाळा महोत्सव झालाच नाही
मागील वर्षी रंकाळा महोत्सवा साठी 25 लाखांची तरतूद करण्यात आली, परंतु महोत्सव झालाच नाही. यावर्षी महोत्सवासाठी तरतूद दिसून येत नाही.
महापालिकेच्या इमारतीचा विसर
अधिकाऱ्यांना महापालिकेच्या इमारतीचा विसर पडला आहे. गेल्या 3-4 बजेट मध्ये निर्माण चौक येथील नवीन इमारतीसाठी 3-4 कोटी रुपयांची तरतूद यासाठी केली जायची. यावर्षी तरतूद न केल्याने महापालिकेला जुन्याच इमारतीतून कामकाज करावे लागणार आहे.
महापालिका शाळांच्या पायाभूत सोईसुविधा विकासासाठी प्राथमिक शिक्षण समितीने 9 कोटींच्या बजेटची मागणी केली होती. परंतु यासाठी एक ही रुपया तरतूद केलेली नाही. प्राथमिक शिक्षण समितीच्या 60 कोटी बजेट मधून फक्त शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांचे पगार भागवता येतील हे वास्तव आहे.
रुग्णालय अद्यावतिकरणाचा निधी दिला परत
नवजात मुलांसाठी संजीवनी असणारे एन आय सी यु युनिट महापालिकेला मंजूर झाले होते. यासाठी 81 लाख निधी जमा देखील झाला. परंतु आम्ही मनुष्यबळासाठी लागणारी निधीची तरतूद करू शकत नाही असे कारण दिल्याने हे युनिट कार्यान्वित होऊ शकले नाही. या ऐवजी छोट्या क्षमतेचे एस एन सी यू युनिट बसवण्यात येणार आहे.
आकांक्षी शौचालयांची नुसती आकांक्षाच
सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधण्यासाठी गेल्या दोन बजेट मध्ये तरतूद करण्यात आली. परंतु आज अखेर स्वच्छतागृहांची आकांक्षा कोल्हापूरकर बाळगून आहेत. ही स्वच्छतागृहे अद्याप टेंडर-वर्क ऑर्डर मध्ये अडकली आहेत.
स्वच्छतागृहे लोकेट करण्यासाठी टॉयलेट ऍप बनवण्यासाठी तरतूद केली आहे. परंतु गुगल मॅप्स सारख्या प्लॅटफॉर्म वर मोफत सुविधा असताना टॉयलेट ऍप चा खर्च गरजेचा नाही.
सांगा आम्ही देह पुरायचा कुठे?
शहरात ख्रिस्ती समाजासाठी पुरेशी दफनभूमी नाही. हीच अवस्था कमी-जास्त प्रमाणात मुस्लिम तसेच लिंगायत समाजाची आहे. यासाठी कोणतीही तरतूद नाही.
ई-गव्हर्नन्स, क्रिडांगण विकासासाठी निधी न ठेवल्याने यासंबंधी करण्यात येणारी कामे थांबणार आहेत.
मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी महापालिका प्रशासन उदासीन आहे. त्यामुळेच कुत्र्यांचे लसीकरण, बंदोबस्त यासाठी निधीची तरतूद केलेली नाही.
प्रदूषण रोखण्यात अपयशी
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत आज अखेर 24 कोटी रुपये आले. परंतु हवा प्रदूषणात कोल्हापूर दिवसेंदिवस अव्वल होत निघाले आहे. एक्यूआय इंडेक्स वर हवा प्रदूषणाची पातळी 150 इतकी सातत्याने राहत आहे. त्यामुळे महापालिकेच्या उपाययोजना फोल ठरत आहेत यावरून दिसून येते.
कर्जबाजारीच्या उंबरठ्यावर
शंभर कोटी रस्ते विकास प्रकल्प व अमृत 2 योजनेमध्ये महापालिकेचा 30 टक्के हिस्सा आहे. त्यासाठी 114 कोटी रुपये उभा करायचे आहेत. परंतु आपले सर्व मार्केट आधीच गहाण ठेवलेल्या महापालिकेला कोठून कर्ज मिळणार हा प्रश्न आहे. कर्ज रोखे उभारून हा विकास करणे अपेक्षित नाही कारण यामुळे कोणतेच नवीन उत्पन्न महापालिकेला मिळणारे नाही.
नव्या आस्थापना खर्चाची तरतूद नाही
आस्थापना आकृतीबंध मंजूर होऊन सर्व्हिस रुल्स बनवण्याचे काम सुरु आहे. परंतु नवीन भरती केल्यानंतर त्याच्या खर्चाची तरतूद महापालिकेकडे नाही.
जेसीबी, टँकरसाठी तरतूद अपेक्षित होती. परंतु ती करण्यात आलेली नाही.
या गोष्टी स्वागतार्ह
महापालिकेचा शाळातील मुलांना इसरो सहल साठी घेऊन जाणे, बोन्द्रे नगर येथे पंतप्रधान आवास योजनेतून उभारलेला रहिवाशी प्रकल्प ही कामे स्वागतार्ह असून अशीच तत्परता बाकी कामांमध्ये असणे अपेक्षित आहे.
त्यामुळे महापालिकेचे बजेट म्हणजे ‘स्वप्नांचे इमले आणि कल्पनांचे मनोरे’ बांधणारे आहे जो वास्तवापासून लांब आहे. निदान यावर्षी तरी उद्धीष्ट पूर्ण करून अनेक योजना प्रत्यक्षात आणल्या जातील अशी अपेक्षा आम आदमी पार्टीच्या वतीने पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली.
यावेळी आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, उत्तम पाटील, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, समीर लतीफ दुष्यंत माने, विजय हेगडे, अनिल जाधव, शशांक लोखंडे, आदम शेख, रमेश कोळी आदी उपस्थित होते.