- थेट पाईपलाईन वरून महाडिक- पाटील पुन्हा थेट आमने- सामने
कोल्हापूर /प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्यात थेट पाईपलाईन योजनेवरून आरोप प्रत्यारोपाच्या फेरी सुरू झाले आहेत. यामुळे लोकसभा निवडणुकीत पाण्यावरून रणांगण गाजण्याची चिन्हे आत्तापासूनच स्पष्ट होत आहेत.
काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना पूर्ण झाल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी या योजनेसाठी मदत केलेल्या अनेकांचा सत्कार केला. योजनेच्या पूर्णत्वासाठी नऊ वर्षे पाठपुरावा केल्यामुळे योजनेचे शिल्पकार म्हणून त्यांचाही सत्कार झाला. तीन महिने उलटल्यानंतर आता याच योजनेवरून महाडिक यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. योजनेची पाहणी करून आल्यानंतर त्यांनी या योजनेची चौकशी करावी अशी मागणी केली. तर त्रुटी असतील तर चौकशीला सामोरे जायला हरकत नसल्याचे सांगत पाटील यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे.
सरकारने दिलेल्या म्हणजेच जनतेच्या निधीतून ही योजना झाली आहे, पण त्यामध्ये अनेक त्रुटी असताना केवळ श्रेय घेण्यासाठी घाईगडबडीने ती सुरू करण्यात आली. त्यामुळेच त्याचे पाणी शहराच्या अनेक भागात पोहोचत नसल्याचा आरोप करताना खासदार महाडिक म्हणाले, या योजनेत अनेक घोटाळे झाले आहेत, त्रुटी आहेत, त्यामुळे या योजनेची चौकशी करावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व संबंधित खात्यांच्या मंत्र्यांना भेटणार आहोत. या योजनेची थर्ड पार्टी ऑडिट करावी अशी आमची मागणी आहे.
दरम्यान, महाडिक यांच्या आरोपानंतर आमदार पाटील यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या मागणीचे आपण स्वागत करतो. पण आरोप आणि मागणी करण्यापूर्वी त्यांनी ही योजना आणि अमृत योजनेत समाविष्ठ कामांची माहिती घ्यायला हवी होती. कोणत्या योजनेत कोणती कामे आहेत, यासंबंधीचा पूर्ण अभ्यास करायला हवा होता. मात्र कोणतीही माहिती न घेता चौकशीची करा म्हणणे म्हणजे खासदार महाडिकांच्या बुद्धीची कीव वाटते.’असा टोला त्यांनी मारला.