स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक इंडिया आघाडी एकत्र लढवणार
इचलकरंजीत झालेल्या बैठकीत निर्णय
इचलकरंजी : आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला येथील इंडिया आघाडी एकत्र लढणार आहे. असा एकमताने निर्णय इंडिया आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला. ही बैठक येथील काँग्रेस कमिटीत पार पडली. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रांतीक सदस्य मदन कारंडे व काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी उपस्थितीतांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या 40 व्या स्मृतिदिनानिमित्त इंडिया आघाडीकडून काँग्रेस कमिटी मध्ये अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बैठकीला सुरुवात करण्यात आली. इचलकरंजी विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या पराभवानंतर पहिल्यांदाच काँग्रेस कमिटी मध्ये इंडिया आघाडीची बैठक पार पडली. त्यामुळे या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. विधानसभा निवडणुकीत इचलकरंजीची जागा ही राष्ट्रवादी शरद पवार गटाला गेली. त्यानुसार राष्ट्रवादीचे मदन कारंडे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर शहरासह ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी कारंडे यांना मोठा पाठिंबा मिळत गेला होता. दरम्यान, इंडिया आघाडीसह घटक पक्षातील सर्वांनी मिळून ही निवडणूक ताकतीने लढवत सुमारे 75 हजार इतके मते कारंडे यांना घेता आली. दरम्यान, महाराष्ट्राचे स्वर्गीय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून बैठकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी शशांक बावचकर व मदन कारंडे यांनी इंडिया आघाडीतील प्रमुख मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला इंडिया आघाडी पूर्ण ताकतीने एकत्र लढण्यावर सर्वांचे एकमत झाले. बैठकीत मँचेस्टर आघाडीचे प्रमुख सागर चाळके, काँग्रेसचे माजी नगरसेवक राहुल खंजिरे , अजित मामा जाधव , सुहास जांभळे , प्रकाश मोरबाळे, उद्धव ठाकरे गटाचे सयाजी चव्हाण , रणजीत जाधव, मलकारी लवटे, अमर जाधव, उदयसिंग पाटील , बाबासो कोतवाल यांच्यासह इंडिया आघाडीतील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.