शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी गतीने व्हावी अविनाश धर्माधिकारी कौन्सिल ऑफ एज्युकेशनतर्फे व्याख्यान

Spread the news

शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी गतीने व्हावी

अविनाश धर्माधिकारी

कौन्सिल ऑफ एज्युकेशनतर्फे व्याख्यान

कोल्हापूर : ‘अध्यात्म ते ए. आय.पर्यंतचा समावेश असलेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर होऊन चार वर्षे झाली, तरी अद्याप अंमलबजावणी गतीने झाल्याचे दिसत नाही. या धोरणाची अंमलबजावणी योग्य स्वरुपात झाली, तर देश बदलेल’, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी येथे केले.

येथील डीआरके कॉमर्स कॉलेजमध्ये देशभक्त पद्मश्री डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘भारतीय शिक्षण पद्धती’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनीताई मगदूम होत्या.

धर्माधिकारी म्हणाले, ‘मेकॉलेप्रणित शिक्षण पद्धतीमुळे ब्रिटिशांसाठी मन, बुद्धीने गुलाम असणारे कारकून तयार झाले. स्वातंत्र्यानंतरही ही शिक्षण पद्धती कळत नकळतपणे सुरू राहिली. ती बदलून भारतीय सामाजिक,

आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरेतील जे जे चांगले आहे, त्याचा आधुनिक ज्ञान विज्ञानाशी समन्वय घडवून भारतीयत्व प्रकट करणारी शिक्षण पद्धती विकसित करणे आवश्यक आहे. देश घडवण्याची ताकद शिक्षणात असल्याचे ओळखून रत्नाप्पाण्णांनी कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या माध्यमातून कृतिशील शिक्षणाची सोय उपलब्ध दिली. त्यामुळे ते खऱ्या अथनि कृतिशील शिक्षणतज्ज्ञ होते.’

यावेळी कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी आगामी शैक्षणिक वर्षात देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार नेतृत्व विकास केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. प्राचार्य डॉ. प्रवीण पाटील लिखित सहा ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉ. प्रसाद मगदूम, अॅड. वैभव पेडणेकर, अमित बाडकर, पार्वती देवी कुंभार नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.भालचंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते. डीआरके कॉमर्स कॉलेजच्या प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अरुण शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. नाईट कॉलेजचे प्राचार्य उत्तम पाटील यांनी आभार मानले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!