*लाट ओसरेल पण, क्षीरसागरांचे कार्य अथांग सागरासारखे अबाधित राहील : आदिल फरास*
क्षीरसागर यांच्या शाहूपुरी परिसरातील सभेस नागरिकांचा उदंड प्रतिसाद
कोल्हापूर, दि. 9 : स्वराज्याचे सेनापती संताजी आणि धनाजी यांना पाहून मोगल सैनिक आणि त्यांचे घोडेही घाबरत असे आणि पळून जात त्याच पद्धतीने राजेश क्षीरसागर यांच्या कार्याची हबकी विरोधकांनी घेतली आहे. ही निवडणूक महाभकास आघाडीचे स्वार्थी नेते विरुद्ध जनसेवक राजेश क्षीरसागर अशी असून, जनता जनसेवकाच्या पाठीशी ठाम उभी राहील, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष आदिल फरास यांनी व्यक्त केला. महायुती उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ शाहूपुरीतील पंचमुखी गणेश मंदिर चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
ते पुढे म्हणाले, राजेश क्षीरसागर यांनी सर्वच क्षेत्रात भरीव काम केले आहे. रंजल्या- गांजल्यासाठी शिवसेनेचे कार्यालय २४ तास उघडे आहे. फेरीवाले, रिक्षा व्यावसायिक, कर्मचारी असो वा व्यापारी, बांधकाम व्यावसायिक आदी सर्वच क्षेत्रातील नागरिकांना सोबत घेवून राजेश क्षीरसागर कार्यरत आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे बाळकडू घेवून जनसेवेचे व्रत त्यांनी हाती घेतले आहे. राजेश क्षीरसागर यांचे कार्य अथांग सागरासारखे असल्याने विरोधकांना त्यांचा पराभव स्पष्टपणे दिसत आहे. त्याचमुळे ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यापासून बाजूला नेवून अपप्रचारावर नेवून ठेवण्याचे षड्यंत्र विरोधकांनी आखले आहे. विरोधकांच्या अपप्रचाराला जनता कधीच बळी पडणार नाही, असे सांगत विकास कामाची दूरदृष्टी असणाऱ्या राजेश क्षीरसागर यांच्या धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटण दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
*सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्या स्वार्थी नेत्याचे ढोंग जनतेने पाहिले*
अर्ज माघारीच्या दिवशी जिल्ह्यातील स्वार्थी नेत्याचा उद्दामपणा कोल्हापूरवासियांनी पाहिला आहे. खासदार शाहू महाराजांना उर्मट भाषेत बोलले गेले. हे शाहूप्रेमू जनता खपवून घेणार नाही. दुपारी उद्दामपणा दाखविणाऱ्या नेत्याला रात्री अश्रू अनावर झाले. हे अश्रू मगरीचे अश्रू असून, गेल्या आठ दिवसात रंग बदलणाऱ्या सरड्याप्रमाणे स्वार्थी ढोंग जनतेने ओळखले असल्याचे शिवसेना गटनेते राहुल चव्हाण म्हणाले.
यावेळी शिवसेना माजी गटनेते राहुल चव्हाण, पद्मजा जाधव, मोहन आरेकर, धनंजय नलवडे, अभिजित काशीद, प्रशांत नलवडे आदी शिवसेना पदाधिकारी व भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.