क्षीरसागरांच्या झंझावती रणनीतीने महाविकास आघाडीच्या मताधिक्याला उत्तरेत ब्रेक
विधानसभेला काँग्रेसला कडवे आव्हान, क्षीरसागरच राहणार महायुतीचे प्रमुख दावेदार
कोल्हापूर , प्रतिनिधी
छत्रपती घराण्याविषयी असलेला आदर, आमदार सतेज पाटील यांची प्रचार यंत्रणा, काँग्रेसच्या आमदारांची ताकद आणि महाविकास आघाडीबाबत सहानुभूतीची लाट यामुळे लोकसभा निवडणुकीत करवीर, हातकणंगले आणि चंदगडमध्ये मोठे मताधिक्य मिळत असताना कोल्हापूर उत्तर आणि दक्षिणेत मात्र याला चांगलाच ब्रेक लागला. उत्तरेत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या रणनीतीने आणि प्रचारयंत्रणेने खासदार शाहू महाराजांच्या मताधिक्याला लगाम घातला. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे काँग्रेसला कडवे आव्हान उभे राहणार हे निश्चित झाले आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे शाहू महाराज विजयी झाले. या विजयात करवीर, राधानगरी आणि चंदगड विधानसभा मतदार संघातील मताधिक्याचा वाटा मोठा आहे. करवीरला ७१ हजार तर राधानगरीत ६६ हजाराचे मताधिक्य मिळाले. कागलला लाखाचे मताधिक्य मिळेल, राधानगरी, चंदगडमध्येही मोठे मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा महायुतीला होती. पण तसे झाले नाही. उलट कागलचे लाखाचे अपेक्षित मताधिक्य तेरा हजारापर्यंत खाली आले. याचा मोठा फटका महायुतीला बसला. बालेकिल्यातही त्यांना मोठा हादरा बसला.
कोल्हापूर उत्तर आणि दक्षिणेतही महाविकास आघाडीला मोठे मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा या आघाडीच्या नेत्यांना होती. महाराजांचा संपर्क, आमदार सतेज पाटील यांची प्रचार यंत्रणा, लवकर उमेदवारी जाहीर झाल्याने महाराजांना प्रचाराला मिळालेला वेळ यामुळे त्यांना मोठा फायदा होईल अशी शक्यता होती. पण याला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मोठा ब्रेक लावला. उत्तर हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या वडिलांच्या निधनामुळे शिवसेनेच्या प्रचार यंत्रणेवर मर्यादा होत्या. पण, वडिलांच्या दिवसकार्याच्या दुसऱ्याच दिवसापासून क्षीसागर सक्रीय झाले. कमी दिवसात मतदारांपर्यंत कसे पोहोचता येईल याची व्युहरचना त्यांनी आखली. या मतदार संघात मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामुळे क्षीरसागर यांनी सर्व प्रचार यंत्रणा हातात घेतली. मुख्यमंत्र्यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी त्यांनी प्रचाराला सुरूवात केली. काम करण्याची हातोटी आणि कार्यकर्त्याचा संग्रह यामुळे प्रचार यंत्रणा गतीमान झाली. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि घटक पक्ष महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची मोट बांधून प्रचार यंत्रणा सक्रीय केली आणि एकतर्फी वाटणारी ही लढत चुरशीच्या टप्प्यावर पोहोचवली.
केवळ १५ दिवसांच्या अल्पकालावधीत सुमारे ५० हून अधिक ठिकाणी “मिसळ पे चर्चा”, ४५ हून अधिक सभा, ३० प्रचार फेऱ्या यासह व्यक्तिगत गाठीभेटी घेवून महायुतीच्या प्रचाराची धुरा एकहाती सांभाळली. दक्षिण मतदारसंघातही ठिकठिकाणी कोपरा सभा, मिसळ पे चर्चा या माध्यमातून जनसंपर्क साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोल्हापूर शहराला देण्यात आलेला कोट्यावधी रुपयांचा निधी, शिवसेनेची सामाजिक कामे मतदारांच्या मनावर बिंबवण्यात क्षीरसागर एकप्रकारे यशस्वी झाले. यामुळे ज्या महाविकास आघाडीला मोठे मताधिक्य मिळेल असे वाटत होते, त्याला मोठा ब्रेक क्षीरसागर यांच्या रणणीतीने लावला.
क्षीरसागर यांनी या मतदार संघात दोन वेळा विजय मिळविला. मालोजीराजे आणि सत्यजित कदम यांचा पराभव त्यांनी केला. जयश्री जाधव यांना महाविकास आघाडीचे आमदार करताना क्षीरसागर यांची मोठी मदत झाली. शिवसेनेचा एक मोठा गट सोबत नसतानाही त्यांनी लोकसभा निवडणुकीत खऱ्या शिवसेनेची ताकद दाखविली. त्यांच्यावर विश्वास ठेवत कॅबीनेट मंत्री दर्जाचे पद मुख्यमंत्र्यांनी कायम ठेवले. हा विश्वास सार्थ करत त्यांनी महाविकास आघाडीला उत्तर मतदार संघात ब्रेक लावला. किरकोळ मताधिक्य मिळाल्याने आघाडीची ताकद या मतदार संघात नसल्याचे स्पष्ट झाले.
या सर्व पार्श्वभूमीवर शहरात शिवसेनेची ताकद कायम असल्याचे क्षीरसागर यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. त्यांनी रोखलेले मताधिक्य आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला कडवे आव्हान देणारे आहे हे नक्की. यामुळे शिवसेनेत आतापासूनच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या मतदार संघावर शिवसेनेचा हक्क असल्याने क्षीरसागर हेच विधानसभेचे दावेदार असणार आहेत. त्यामुळे आतापासूनच त्यांनी व्युहरचना करण्यास सुरूवात केली आहे.