कोंडी फुटेना, सांगली सुटेना, शिवसेनेची मशाल पेटेना !

Spread the news

 

कोंडी फुटेना, सांगली सुटेना, शिवसेनेची मशाल पेटेना !

 

कोल्हापूर

सांगलीची जागा काँग्रेसकडून सुटेना, त्यामुळे आघाडीत निर्माण झालेली कोंडी फुटत नसल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाला पश्चिम महाराष्ट्रात मशाल पेटवायची कशी या प्रश्नांचे उत्तर मिळत नसल्याने अडचणी वाढत आहेत. कोल्हापूर सोडली, आता सांगली सोडा असा आग्रह त्यांनी धरला असला तरी काँग्रेस ते मान्य करायला तयार नाही. यामुळे ठाकरे गट सध्या अस्वस्थ आहे.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर व हातकणंगले या दोन जागा शिवसेनेकडे असतील असे चित्र होते; पण, दोन्ही जागा मिळण्याची चिन्हे कमी झाली आहेत. कोल्हापूरची जागा श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्यासाठी काँग्रेसला सोडण्यात आली. काँग्रेसने त्यांची उमेदवारी जाहीर केली. कोल्हापूरच्या नवीन राजवाड्यावर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. केवळ प्रचारालाच नव्हे तर विजयी सभेलाही येण्याची ग्वाही दिली.

कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा सहजपणे सोडतील असे ठाकरे यांना वाटत होते. पण तसे होताना दिसत नाही. उलट न दिल्यास बंडखोरी करण्याचा इशारा काँग्रेसचे नेते देत आहेत. ठाकरे यांच्या मिरज येथील मेळाव्याकडे या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते या दोघांनीही पाठ फिरवली. याच सभेत ठाकरे यांनी शिवसेनेचे उमेदवार म्ह्णून चंद्रहार पाटील यांची  घोषणा केली. पण काँग्रेस त्यांना मदत करणार का हा फार मोठा प्रश्न आहे. यामुळे शिवसेनेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

शिवसेने ठाकरे गटाला हातकणंगलेची जागा लढवायची इच्छा आहे, पण तेथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा मागितला आहे. या जागेच्या बदल्यात राज्यात सर्वत्र मदत करण्याचा शब्द माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. यामुळे ही जागादेखील सोडण्याची वेळ ठाकरे गटावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडली, सांगलीत काँग्रेस मदत करण्याची शक्यता दिसत नाही, यामुळे आता हातकणंगलेत काय करायचे असा प्रश्न ठाकरे यांना पडला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात सांगली वगळता सध्या तरी ठाकरे गटाला लढायला एकही जागा मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत. मशाल चिन्ह जनतेत पोहोचण्यासाठी एक तरी जागा मिळावी हा ठाकरेंचा आग्रह आहे. या आग्रहातूनच त्यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या उमेदवारीला काँग्रेसचा टोकाचा विरोध आहे. पक्ष विसर्जीत करून जागा लढण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांनी दिला आहे. यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे दिसत आहेत.

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!