कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा विजय : आमदार राजेश क्षीरसागर
कोल्हापूर दि.२३ : २०१९ च्या पराभवानंतर जनतेच्या प्रश्नासाठी दुसऱ्या दिवशी रस्त्यावर उतरलो. संयम, शांतता आणि विकासाची दूरदृष्टी ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरच्या विकासासाठी काम करत राहिलो. हा विजय कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा असून, कोल्हापूरचे खरे उत्तर जनतेने विरोधकांना दिले आहे. येणाऱ्या काळात जनतेने दिलेला आशीर्वाद सार्थकी लावण्यासाठी अहोरात्र कष्ट करून कोल्हापूरच्या विकासात मोलाचे योगदान देवू, असे प्रतिपादन महायुतीचे विजयी उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी केले.
ते पुढे म्हणाले कि, कोल्हापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे निकालाने स्पष्ट झाले आहे. प्रचारामध्ये विरोधकांनी बदनाम करण्याचा केलेला केविलवाणा डाव कोल्हापूरच्या जनतेने हाणून पाडला. लाडक्या बहिणींचा मिळालेले पाठबळ हेही विजयाचे प्रमुख कारण आहे. या विजयामुळे माझी जबाबदारी निश्चितच वाढली आहे. येणाऱ्या काळात कोल्हापूरचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध असेन. यासह नाविन्यपूर्ण प्रकल्पांच्या माध्यमातून कोल्हापूरच्या विकासात भर घालण्याचा माझा निश्चितच प्रयत्न असेल. कोल्हापूरवासियांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी ऋणी राहीन. माझ्या विजयात मोलाचा वाटा उचलणारे महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शहरातील सर्व समाज, तालीम संस्था मंडळे, हितचिंतक मित्र मंडळी यांचे मनपूर्वक आभार मानत असल्याचेही राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.