कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून धणुष्यबाण चिन्हावर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे तर हातकणंगलेतून शौमिका महाडिक किंवा प्रकाश आवाडे यांची भाजपच्यावतीने उमेदवारी जवळजवळ निश्चित झाल्याची समजते. यामुळे जिल्ह्यातील एक जागा शिंदे गटाला आणि दुसरी जागा भाजपला मिळणार असली तरी दोन्ही उमेदवार मात्र भाजपचेच असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, कोल्हापूर बाबत असा कोणताही निर्णय झाला नसून आपणच मैदानात उतरणार असल्याचे मंडलिक स्पष्ट करत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागा सध्या शिंदे गटाकडे आहेत. यामुळे या जागा आम्हालाच मिळाव्यात असा आग्रह या गटाने धरला आहे. खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्याबाबत नाराजी असल्याचे कारण पुढे केले जात आहे. यामुळे एक जागा आम्हाला द्या असा आग्रह भाजपने धरला आहे. नंतर दुसऱ्या जागेवर आमचा उमेदवार घ्या असा प्रस्ताव ठेवण्यात येत आहे. या दोन्ही मागण्या मान्य होण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे कोणती एक मागणी मान्य होणार यावरच पुढील राजकारण अवलंबून आहे. मागणी मान्य झाल्याच्या शक्यतेने कोल्हापूर लोकसभा मतदार संघ शिंदे गटाला देताना समरजित घाटगे यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, ही जागा शिवसेना शिंदे गटाला आणि उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याचा दावा मंडलिक गटाच्या वतीने सुरू आहे. याबाबतच्या बातम्या या खोडसाळपणे दिल्या जात असल्याचा आरोप मंडलिक यांनी केला आहे.
कोल्हापूरची जागा शिंदे गटाला गेली तर हातकणंगले मतदार भाजपला मिळण्याची चिन्हे आहेत. तसे झाल्यास धैर्यशील मानेंना कमळ चिन्हावर लढवा अशी विनंती शिंदे गटाकडून होऊ शकते. अर्थात याला माने नकार देण्याची शक्यता फारच कमी आहे. पण त्यांच्याबाबत असलेल्या नाराजीमुळे भाजप याला कितपत तयार होणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे. यामुळे यामुळे शौमिका महाडिक, विनय कोरे अथवा प्रकाश आवाडेंना मैदानात उतरवणार याची उत्सुकता वाढणार आहे. सध्या तरी महाडिक आणि आवडे यांचे नाव आघाडीवर आहे. या दोन नावाबरोबरच आमदार मयूर संघाचे संजय एस. पाटील व राहूल आवाडे यांची नावे देखील सध्या चर्चेत आहेत.